प्रतिनिधी : राजेश येसेकर चंद्रपूर : पत्नीला पळवून नेल्याच्या संशयातून एका ३५ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून दगडाने डोक्यावर वार करीत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) सकाळी ११.२० ते ११.३० वाजताच्या सुमारास वरोरा येथील ट्रामा केअर सेंटरसमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सैय्यद अली सैय्यद गुलाब (वय ३५, रा. रंगणापुरा, ता. वणी, जि. यवतमाळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ते आपला मित्र योगेश दुर्गे याच्यासोबत मोटारसायकलने कच्चेपार नांदेडकडे वरोरा मार्गे जात होते. यावेळी वरोरा शहरातील ट्रामा केअर सेंटरसमोरील रस्त्यावर त्यांची मोटारसायकल अडविण्यात आली.
यावेळी बंटी उर्फ नितीन प्रकाश पडोळे (रा. वणी) याने 'तू माझ्या पत्नीला का पळवून नेले?' असा जाब विचारत सैय्यद अली यांना मोटारसायकलवरून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नितीन याने दगडाने त्यांच्या डोक्यावर वार केला. तर त्याचा मेहुणा गणेश रमेश उईके (रा. वरोरा) यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या मारहाणीत सैय्यद अली यांच्या डोक्याला, हाताच्या मनगटाला तसेच उजव्या हाताच्या करंगळीजवळ दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्वप्नील उमरे यांनी वरोरा पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमीला वरोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचारानंतर सैय्यद अली यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५) अंतर्गत बंटी उर्फ नितीन प्रकाश पडोळे आणि गणेश रमेश उईके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.


0 टिप्पण्या