CEO यांच्या आदेशालाच शहादा गटविकास अधिकाऱ्यांची केराची टोपली? महेश पोतदार यांच्यावर कारवाईची मागणी!
ग्रामपंचायतीच्या१,३६,४०,१५५ रुपये निधीचा हिशेब द्या! दोषींवर कारवाई करा; अन्यथा रस्त्यावर उतरू – बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा
चित्रा न्यूज प्रतिनिधी
नंदुरबार : शहादा तालुक्यातील लंगडीभवानी ग्रामपंचायतीच्या सन २०२१ ते २०२६ या कालावधीतील तब्बल १ कोटी ३६ लाख ४० हजार १५५ रुपयांच्या निधीच्या कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीच्या निधीच्या कथित अपात्र व अनियमित व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिले असतानाही संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा यांनी निर्धारित मुदतीत चौकशी अहवाल सादर न केल्याचा आरोप बिरसा फायटर्स संघटनेने केला आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी श्री. महेश पोतदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, लंगडीभवानी येथील श्री. चेतन शांतिलाल पावरा यांनी ग्रामपंचायतीच्या सन २०२१ ते २०२६ या कालावधीतील एकूण १,३६,४०,१५५ रुपयांच्या निधीच्या कथित अपात्र व अनियमित व्यवहारांबाबत दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश पारित करून गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा यांना सदर प्रकरणाची १५ दिवसांच्या आत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.मात्र,आदेश देऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही चौकशी पूर्ण झालेली नाही. असा आरोप संघटनेने केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाचे गटविकास अधिकारी पालन करत नसतील तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार ?असा संतप्त सवाल बिरसा फायटर्सने उपस्थित केला आहे. गटविकास अधिकारी महेश पोतदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा!बिरसा फायटर्सने या प्रकरणात स्वतंत्र चौकशी समिती नेमून ग्रामविकास अधिकारी महेश जाधव आणि सरपंच प्रिती निलेश सुळे यांच्या कार्यकाळातील संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू न केल्यास बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, सोमनाथ पावरा, मधुकर भंडारी, वडगाव अध्यक्ष योगेश रावताळे, चेतन पावरा, जतन पावरा, दिनेश पवार, राकेश मोरे, अनिल पवार, जगदीश डूडवे, कोषाध्यक्ष पप्पू आर्य, चिंगरा किराडे आदी उपस्थित होते.आता प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेऊन चौकशी पूर्ण करणार की प्रकरण पुन्हा कागदोपत्रीच राहणार, याकडे लंगडीभवानीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या