Ticker

6/recent/ticker-posts

◾साकोलीत बस ट्रेलरचा भीषण अपघात

◻️चालक, वाहकासह ७ जण गंभीर जखमी ; उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू ; पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल 

आशिष चेडगे / चित्रा न्यूज नेटवर्क 

साकोली: शहरातील अत्यंत धोकादायक लाखांदूर रोड वळणावर व माकोडे पेट्रोल पंपाजवळ आज गुरु. ०९ जूलैला दु. ०३:४५ दरम्यान झालेल्या एका बस व ट्रैसरच्या भीषण रस्ता अपघातात बस चालक आणि वाहकासह एकूण सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आणि मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. माहिती होताच साकोली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
             मिळालेल्या माहितीनुसार आज गुरूवारी ३:४५ च्या सुमारास साकोली बस स्थानकावरून नवेगावबांधकडे निघालेली साधारण बस क्र. एम एच ०७ सी ९५४३ ही लाखांदूर मार्गावरील माकोडे पेट्रोल पंपापुढील वळणावर पोहोचली. त्याच वेळी, लाखांदूर कडून साकोलीच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलर क्र. सीजी ०४ एन झेड २८०७ ने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला आणि प्रवासी आत अडकून पडले. या अपघातात बस चालक श्यामराव धनपाते वय ५६ आणि वाहक राकेश दड्डेमल वय ४० हे गंभीर जखमी झाले. यांव्यतिरिक्त महागाव येथील जयमाला लांडगे ५०, सानगडी येथील जयश्री केद्रे ३३, सासरा येथील नेहा गोटेफोडे १९, गुंजन डुंभरे १९ व सत्यभामा रंगारी वय ६५ हे प्रवासीही गंभीरपणे जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिकांच्या व पोलीसांच्या मदतीने त्वरित साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने बसचालक श्यामराव धनपाते, वाहक राकेश दड्डेमल आणि प्रवासी जयमाला लांडगे, जयश्री केद्रे, नेहा गोटेफोडे व सत्यभामा रंगारी यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले.
-------------------------

• तातडीची आर्थिक मदत •
 
एसटी महामंडळाने सुरुवातीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्यासाठी प्रत्येक जखमी प्रवाशांना १,००० रुपयांची तातडीची आर्थिक मदत दिली आहे. असे आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात सांगितले.

• तासनतास वाहतूक कोंडी 

अपघातानंतर लाखांदूर मार्गावरील वळणावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वृत्त लिहिपर्यंत हा मार्ग पूर्णपणे बंद होता आणि ट्रेलर हटवल्याशिवाय वाहतूक पूर्ववत होऊ शकली नाही. परिणामी, वडसा, मोरगाव अर्जुनी आणि चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. तसेच, ही घटना शाळा सुटण्याच्या वेळेस घडल्याने, साकोलीला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बराच वेळ वाट पाहावी लागली.

• साकोली पोलीसांकडून तपास सुरू • 

घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास केला जात असून साकोली पोलीस ठाणे निरीक्षक एम. पी. आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या