Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या दि.१४ नोव्हेंबर २०२६ ला असलेल्या
२३२ व्या जयंतीनिमित्त साहित्यिक व अभंगकार 
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

       भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची 
       मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू 
          वस्ताद लहुजी साळवे 

      आद्य क्रांतिगुरू ,भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्य शिल्पकार,क्रांतिकारकांचे गुरू, युगपुरुष, समाजसुधारणेचा संगम,स्वातंत्र्यसमरातील धगधगते अग्निकुंड,पराक्रम आणि देशभक्तीचा महामेरू,भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे महानायक,भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर क्रांतिकारक आणि समाजसुधारक वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या दि.१४ नोव्हेंबर २०२६ ला असलेल्या २३२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
      आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म १७९४ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या १४ तारखेला  पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावी झाला. विठाबाई आणि राघोजी या त्यांच्या मातापित्यांच्या सुसंस्कारातून ते घडत गेले. त्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्याचे रक्षण करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या पूर्वजांना त्यांच्या अद्वितीय शौर्याबद्दल आणि युद्धकौशल्याबद्दल 'राऊत' ही मानाची पदवी देऊन गौरविले होते. त्यासोबतच महाराजांनी त्यांच्याकडे स्वराज्यातील अत्यंत महत्त्वाच्या पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती.ऐतिहासिक काळात 'राऊत' हा शब्द शूरवीर, पराक्रमी योद्धा किंवा घोडदळातील कुशल सैनिक या अर्थाने वापरला जात असे. लहुजी साळवे यांचे पूर्वज विशेषतः त्यांचे पणजोबा/खापर पणजोबा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अत्यंत निष्ठेने आणि पराक्रमाने लढत होते. लहुजींचे वडील राघोजी साळवे हे पेशव्यांच्या पदरी शिकारखाना आणि शस्त्रागार खात्याचे प्रमुख होते. १८१७ च्या खडकीच्या लढाईत ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यांना वीरमरण आले.साळवे कुटुंबातील लोक दांडपट्टा, तलवार, भाला आणि कुऱ्हाड चालवण्यात अत्यंत पारंगत होते. शत्रूच्या सैन्यात घुसून लढणे, गुप्त बातम्या काढणे आणि जंगलात मार्ग शोधणे यांसारख्या कठीण कामात त्यांचा हातखंडा होता. साळवे घराण्याचे हेच युद्धकौशल्य आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा पाहून शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत' ही पदवी बहाल केली होती. महाराजांनी दिलेला हा सन्मान आणि जबाबदारी साळवे घराण्यात पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहिली. लहुजींचे वडील राघोजी साळवे हे देखील याच 'राऊत' पदवीने ओळखले जात असत आणि त्यांच्याकडेही पुरंदर परिसराच्या रक्षणाची व पेशव्यांच्या शिकारखान्याची जबाबदारी होती.
याच पराक्रमी आणि 'राऊत' पदवीने सन्मानित झालेल्या घराण्याचा वारसा पुढे वस्ताद लहुजी साळवे यांनी चाल विला. त्यांनी १८२२ मध्ये पुण्यात तालीम सुरू करून महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांसारख्या अनेक क्रांतिकारकांना व समाजसुधारकांना युद्धकलेचे व देशभक्तीचे धडे दिले. कारण लहुजींनी लहानपणापासूनच आपल्या वडिलांकडून युद्धकलेचे आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले होते. ते दांडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी आणि नेमबाजी या कलांमध्ये अत्यंत निपुण होते.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी पुणे येथील आपल्या तालमीत (युद्धकला प्रशिक्षण केंद्रात) सर्व जाती-धर्मांतील तरुणांना एकत्र आणून युद्धकलेचे आणि शस्त्रास्त्र चालवण्याचे शिक्षण दिले. त्यांच्या तालमीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि समाजसुधारणेच्या चळवळीतील अनेक महान नेते व क्रांतिकारक घडले. लहुजी वस्ताद साळवे यांचे प्रमुख शिष्य महात्मा जोतीराव फुले यांनी लहुजी वस्तादकडून मल्लविद्या, दांडपट्टा आणि शस्त्रकलेचे धडे घेतले होते. सशस्त्र क्रांतीचे जनक मानल्या जाणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांनी त्यांच्या तालमीत बंदूक चालविणे व निशाणेबाजीचे प्रशिक्षण घेतले.लोकमान्य बाळ गंगाधर  टिळकांनीही त्यांच्या आखाड्यात शारीरिक शिक्षण आणि युद्धकलेचे धडे गिरवले होते.आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी लहुजी वस्तादांचे मार्गदर्शन आणि युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले.दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या चाफेकर बंधुंनी  त्यांच्या तालमीत शस्त्रविद्या आत्मसात केली होती.
प्रसिद्ध समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांच्याकडून शारीरिक व शस्त्रप्रशिक्षण घेतले होते.महात्मा फुले यांचे सहकारी सदाशिवराव गोवंडे आणि सदाशिवराव परांजपे हे देखील त्यांचे शिष्य होते. सन १८१७ च्या खडकीच्या युद्धात त्यांचे वडील राघोजी साळवे इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद झाले. वडिलांच्या बलिदानानंतर लहुजींनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. त्यांनी सन १८२२ मध्ये पुण्यातील गंज पेठेत देशातील पहिले शस्त्रास्त्र प्रशिक्षण केंद्र म्हणजेच तालीम सुरू केली. या तालमीच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शारीरिक आणि लष्करी शिक्षण देण्यास सुरुवात केली. विषमतेच्या काळात सर्व जाती-धर्मांतील तरुणांना एकत्र आणून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतिकारकांची फळी उभी केली. त्यांना लोक आदराने 'लहुजी वस्ताद' आणि 'आद्य क्रांतिगुरू' म्हणून ओळखू लागले.
"आद्य क्रांतिगुरू । लहुजी वस्ताद ।
समतेचा नाद । साळवेंना ॥"
त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातही क्रांतिकारकांना फार मोठे पाठबळ दिले होते. स्वातंत्र्यलढ्यासोबतच त्यांनी सामाजिक समतेच्या चळवळीतही मोलाचे योगदान दिले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळांना लहुजींनी संरक्षण दिले.
"फुलेंच्या शाळेला । संरक्षण दिले ।
 विद्यावान झाले । मुलंमुली ॥"
                समाजातील विरोधकांच्या हल्ल्यांपासून फुले दाम्पत्याचे रक्षण करण्यासाठी ते नेहमी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आणि शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यांची पुतणी मुक्ता साळवे ही महात्मा फुलेंच्या शाळेत शिकणारी एक प्रखर विचारवंत विद्यार्थिनी होती.
मुक्ता साळवे या १९ व्या शतकातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या शाळेतील एक तेजस्वी विद्यार्थिनी आणि 'आद्य दलित लेखिका' होत्या. मुक्ता साळवे यांचा जन्म ५ जानेवारी १८४० रोजी पुणे येथे एका मातंग कुटुंबात झाला. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनीच मुक्ताला शिक्षणासाठी फुले दाम्पत्याच्या शाळेत पाठविले होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या काही विद्यार्थिनींपैकी एक होत्या. १ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. या ऐतिहासिक शाळेत सर्व जाती-धर्मांतील मुलींना प्रवेश देण्यात आला होता. ऐतिहासिक संदर्भांनुसार शाळेत प्रवेश घेतलेल्या पहिल्या सहा प्रमुख मुलींमध्ये मुक्ता साळवे यांचे नाव होते. या विद्यार्थिनीने अतिशय जिद्दीने शिक्षण घेतले आणि विचार करण्याची क्षमता विकसित केली . इ.स. १८५५ मध्ये वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी 'मांग महारांच्या दुःखाविषयी' हा प्रसिद्ध निबंध लिहिला. हा निबंध १ मार्च १८५५ रोजी 'ज्ञानोदय' या मासिकात प्रसिद्ध झाला. या निबंधातून त्यांनी तत्कालीन पेशवाईतील जातीय अत्याचार, अस्पृश्यता आणि स्त्रियांच्या दुःखावर परखड भाष्य केले. त्यांनी आपल्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक अभ्यासकांनी मुक्ता साळवे यांना 'पहिली दलित स्त्री लेखिका' किंवा 'दलित स्त्री साहित्याचा पहिला हुंकार' म्हणून गौरवले आहे. गो. पु. देशपांडे लिखित 'सत्यशोधक' या नाटकातही त्यांची भूमिका रेखाटली गेली आहे.
       वस्ताद लहुजी साळवे यांनी अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या तालमीतील विहीर सर्वांसाठी खुली केली होती. जातिभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. 
इंग्रज सरकारच्या नजरेत धूळ फेकण्यासाठी ते अनेकदा वेषांतर करून क्रांतिकारकांना गुप्त मदत पोहोचवत असत.वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांचे संपूर्ण आयुष्य देशभक्ती, त्याग आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी समर्पित होते.वयाच्या ८६ व्या वर्षी दि.१७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.पुण्यातील संगमवाडी येथे त्यांची समाधी असून ते स्थळ आजही राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य आणि समतेच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. आद्य क्रांतिगुरू व क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या दि.१४ नोव्हेंबर २०२६ रोजी असलेल्या २३२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
 लहुजी वस्ताद । आज जन्मदिन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ॥

             राज्यस्तरीय महात्मा फुले 
            आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
                  साहित्यिक व कवी 
           प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, 
              काँग्रेस नगर,अमरावती.
          भ्रमणध्वनी:८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या