Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या शताब्दी वर्षानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प!


 चित्रा न्यूज  
पुणे : भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या शताब्दी वर्षानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने २५ डिसेंबर २०२६ ते डिसेंबर २०२७ या कालावधीत पुणे जिल्हा आणि महानगर परिसरात वर्षभर विविध कार्यक्रम, महिला मेळावे, परिषदा आणि जनजागृती उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कार्यक्रमांच्या पूर्वनियोजनासाठी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर यांची देखील उपस्थिती होती. 

भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महिलांमध्ये सामाजिक, वैचारिक आणि ऐतिहासिक जाणीव निर्माण करणे, मनुस्मृती दहन दिनाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच महिलांचा व्यापक सहभाग वाढविणे, या उद्देशाने वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीच्या सुरुवातीला वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा आणि शताब्दी वर्षाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. अनिता चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी ॲड. अरविंद तायडे (पुणे शहराध्यक्ष), सीमाताई भालेसाई (पुणे जिल्हा अध्यक्ष), संतोष लोखंडे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), अनिताताई चव्हाण (पुणे शहर अध्यक्ष), शारदाताई बनसोडे (पिंपरी-चिंचवड अध्यक्ष), ॲड. सर्वजित बनसोडे (महाराष्ट्र प्रदेश सदस्य), जितरत्न पटाईत (राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी) आणि ॲड. रेखाताई चौरे (पुणे शहर महिला आघाडी महासचिव) यांची प्रमुख उपस्थिती होती.

शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पहिली परिषद पुणे येथे, तर दुसरी परिषद महाड (जि. रायगड) येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी स्वतंत्र नियोजन समिती तयार करणे, कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करणे आणि शताब्दी वर्षभरातील उपक्रमांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करण्यावर बैठकीत चर्चा झाली.

२५ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सभेचे ठिकाण निश्चित करणे, प्रमुख पाहुण्यांची निवड, विविध जबाबदाऱ्यांचे वाटप आणि आर्थिक नियोजन याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच महिला मेळावे आयोजित करून या अभियानाचा संदेश शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविण्यात आले.

२५ डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन असून, सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामगिरीविरोधातील ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवसाचे ऐतिहासिक आणि वैचारिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांमध्ये या विषयाबाबत जागरूकता निर्माण करणे, अधिकाधिक महिलांना अभियानाशी जोडणे आणि समाजातील नव्या घटकांचा सहभाग वाढविणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

विविध समित्यांकडे जबाबदाऱ्यांचे वाटप -

शताब्दी वर्षातील कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठकीत विविध जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले. आर्थिक नियोजनाची जबाबदारी नितीन कांबळे यांच्याकडे, प्रचार-प्रसार समितीची जबाबदारी संदीप चव्हाण यांच्याकडे, स्टेज नियोजनाची जबाबदारी भारती वांजळे यांच्याकडे, हॉल नियोजनाची जबाबदारी वर्षाताई जाधव यांच्याकडे, तर मीडिया नियोजनाची जबाबदारी संदीप चौधरी यांच्याकडे देण्यात आली. गेस्ट नियोजनाची जबाबदारी सागर आल्हाट यांच्याकडे सोपविण्यात आली.

तसेच ग्रामीण भागातील संपर्क वाढविणे, गावागावांत अभियानाची माहिती पोहोचविणे आणि स्थानिक पातळीवर महिलांना सहभागी करून घेण्यासाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था उभारण्याबाबतही चर्चा झाली.

महाराष्ट्रभर अभियानाचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार -

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची व्यापक रूपरेषा तयार करणे, प्रास्ताविक व इतर कार्यक्रमांचे नियोजन करणे, नवीन लोकांना अभियानाशी जोडणे आणि महिलांमध्ये शताब्दी वर्षाचा संदेश पोहोचविणे यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाला केवळ पुणे जिल्हा आणि महानगरापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी अंजलीताई आंबेडकर यांनी क्रांतिकारी इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करत हा ऐतिहासिक दिवस विसरता कामा नये, असे सांगितले. मनुवादी वृत्ती आजही संपलेली नाही. त्यामुळे स्त्री मुक्तीचा लढा, सामाजिक समतेचा विचार आणि ऐतिहासिक संघर्षाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीचे सूत्रसंचालन ॲड. रेखा चौरे यांनी केले. यावेळी आयोजित या आढावा बैठकीला पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रभाग, वार्ड, शाखे, सर्व अध्यक्ष, महासचिव आदि उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या