बळीराजाचा आर्त टाहो शिंदे सरकार आता इकडे लक्ष द्या हो !
पिकपाणी वार्तापत्र तालुका माहूर जि.नांदेड
जयकुमार अडकीने तालुका प्रतिनिधी माहूर जि. नांदेड
माहूर- विविध अस्मानी व सुलतानी संकटाना सामोरे जाऊन लढण्याची सवय झालेल्या बळीराजाच्या मागील संकटाचे शुल्ककाष्ठ त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नसल्याचे दि. ६ जुलै ते आता पर्यत सुरु असलेल्या अतिवृष्टीने सिद्ध झाले असून अस्मानी व सुलतानी संकटाच्या मालिकेमुळे तडजोडीचे जीवन जगणे नित्यनेम बनलेल्या व राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या आलीया भोगासी असावे सादर, या अभंगाच्या संदेशाप्रमाणे जगत जगत जगण्यास वैतागलेला बळीराजा दि. ६ जुलै २०२२ ते आता पर्यत सुरु असलेल्या अतिवृष्टीने भविष्यातील स्वप्न रंगविलेले उभे पिक उध्वस्त झाल्याने हिरवे स्वप्न भंगलेला शेतकरी आता “शेती गेली वाहून, काय करू अन कसं करू आता जिवंत राहून! असा आर्त टाहो फोडत असलेला शेतकरी नव निर्वाचित शिंदे सरकारनेच आता शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे असा धावा करतांना दिसत असून मूळ साताऱ्याचे शेतकरीपुत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे त्यांच्या स्टाईलने आजपर्यतच्या ठराविक प्रक्रीयेपेक्षा काहीतरी वेगळी आणि तातडीने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणारी प्रक्रिया राबविणारी एखादी योजना राबवतील ही आस धरून आहे.
माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच निसर्गाचा कोप असतो सुरुवातीला पावसाचा लपंडाव त्यामध्ये दुबार तिबार पेरण्या कराव्या लागून जोरदार आर्थिक फटका बसल्यानंतर नुकत्याच तग धरु लागलेल्या पिकांना अतिवृष्टीने खरडून नेणे असो किंवा अनेक वेळा पिके काढणीस आलेली असतांना निसर्गाचा कोप होऊन हाता तोंडाशी आलेला घास असो, महावितरणच्या भारनियमन व सक्तीच्या वीज बिल वसुली, वीज जोडणी बंद करण्याची मोहीम असो किंवा बँकेच्या कर्ज वसुलीचा तगादा असो किंवा संसारात अडचणीत घेतलेल्या सावकारी कर्जाचा वसुली तगादा असो या सर्व बाबींना तोंड देत कायम तडजोडीचे जीवन जगत आपल्या सौभाग्यवतीला,पाल्यांना व कुटुंबियांना आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधाही व्यवस्थित रित्या पुरवू शकत नाही, शिवाय या भागात कोणतीही औद्योगिक वसाहत नसल्याने सर्व काही शेतीवरच अवलंबून असलेला बळीराजा यावेळी पुरता कोलमडलेला दिसत असून आता भविष्यात रंगविलेले पाल्याना चांगल्या दर्जाचे शिक्षण, कर्तव्य असलेली परिवारातील मंगल कार्ये, कुलधर्म व सण उत्सवात कुटुंबियांच्या हौस पुरविण्याच्या सर्व स्वप्नांचा चकनाचूर झाला असल्याने पुरता हतबल झालेला आहे. असे असले तरी आगामी जि.प. प.स. च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही राजकीय पुढारी गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करीत कोरडा पुळका दाखवत सहानुभूती मिळविण्याचा व आगामी निवडणुकीत मदतानाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा स्वार्थ ठेवत “ ताकाला जाऊन गाडगे लपवणे” हा प्रकार करतांना दिसत आहेत.
तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६२५.६९हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ३४ हजार४०१.७३ हेक्टर आहे. तालुक्यातील चार महसूल मंडळा पैकी माहूर मंडळाचे भौगोलिकक्षेत्र १३ हजार ७१२ .९९ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ८ हजार १२७.४० हेक्टरआहे.वाई मंडळाचे भौगोलिक क्षेत्र ९ हजार७१.४६ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ७ हजार ९८९.९३ हेक्टर आहे, वानोळा मंडळाचेभौगोलिक क्षेत्र १६ हजार २७४ .३८ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ८ हजार ७००.६५ हेक्टर आहे, सिंदखेड मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १२ हजार ५६६ .६९ हेक्टरअसून पेरणी योग्य क्षेत्र ९ हजार ५८३ .७५ हेक्टर आहे. यावर्षी ज्वारी ४०० हेक्टर, तूर ३हजार ६८३ हेक्टर उडीद ३६१ हेक्टर, मुग ३८६ हेक्टर सोयाबीन १० हजार २२४ हेक्टर, कापूस १८ हजार २५५ हेक्टर, हळद ४२३ हेक्टर व इतर ३६४ एक्कर असा एकूण ३४ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचा यावर्षी पेरा झाला. परंतु दि. ६ जुलै पासून आजतागायत सुरु असलेल्या पावसाने ७५ ते ८० टक्के त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे शेत खरडून तर काही शेतकऱ्यांचे शेतात पावसाचे पाणी तुंबल्याने पिके सडल्या जाऊन नुकसान झाले असल्याचा एकंदर अंदाज आहे. राजकारणात मागील काही दिवसात आपला सबसे हटके अंदाज दाखविणारे शेतकरी पुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत ते केंद्रात सुद्धा त्यांच्या मनाजोगे सरकार असल्याने आणि राज्यात सुद्धा त्यांच्या मनासारखे त्यांनी घडवून आणले असल्याने निश्चितच काही तरी वेगळा प्रयोग करून तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा माहूर तालुक्यातील शेत्तकरी बाळगून आहे.


0 टिप्पण्या