चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर प्रतिनिधी :सूर्य आग ओकत असताना शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी विद्यार्थी शोध मोहिमेत भर उन्हात फिरणाऱ्या एका आदर्श शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक राजू हिवंज यांचे उष्माघाताच्या संशयावरून निधन झाल्याने शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सध्या उन्हाचा पारा चाळीशीपार गेला आहे. अशा दाहक उन्हातही शासनाच्या आदेशानुसार शिक्षकांना पटसंख्या कायम राखण्यासाठी ‘विद्यार्थी शोध मोहीम’ राबवावी लागत आहे. राजू हिवंज सर गेल्या काही दिवसांपासून भर दुपारी पालक व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेटी देत होते.
दरम्यान, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घरी पोहोचताच अचानक भोवळ येऊन ते कोसळले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. दोन-तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ही भोवळ उष्माघातामुळे आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
*कामाचा ताण आणि जनगणनेची भर*
शिक्षकांवर आधीच अशैक्षणिक कामांचा प्रचंड ताण आहे. पटसंख्या पूर्ण करण्यासाठी शिक्षक उन्हातान्हाची पर्वा न करता फिरत असतानाच, शासनाने 2027 च्या जनगणनेची जबाबदारीही शिक्षकांवर सोपवली आहे. 16 तारखेपासून शिक्षक घरगणनेच्या कामात व्यस्त होणार आहेत.
भर उन्हात जनगणनेचे काम दिल्याने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. "अशा प्रकारच्या घटना घडल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार?" असा सवाल शिक्षक वर्गातून उपस्थित होत आहे.
राजू हिवंज सरांच्या अकस्मात निधनाने विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग हळहळला आहे. एका आदर्श, विद्यार्थीप्रिय शिक्षकाला मुकल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
---------------------------------
दुर्दैवी! भद्रावती येथील आदर्श शिक्षक राजू हिवंज यांचे निधन. पटसंख्येसाठी भर उन्हात विद्यार्थी शोध मोहिमेवर असताना उष्माघाताचा संशय. शिक्षकांवर कामाचा ताण + जनगणनेची जबाबदारी.
----------------------------------


0 टिप्पण्या