Ticker

6/recent/ticker-posts

बनावट कागदपत्रांद्वारे पीक विमा घोटाळा?

माहूर न्यायालयाचे सिंदखेड पोलिसांना FIR दाखल करण्याचे आदेश


चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर : प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक विमा रक्कम उचलल्याच्या गंभीर प्रकरणात माहूर येथील न्यायालयाने सिंदखेड पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रथमेश प्रमोद उपगनलावार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार, मौजे वाई बाजार येथील गट क्रमांक 200 व 201 ही जमीन त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची असून संबंधित जमिनीबाबत साजिद माजिद खान व मोईन माजिद खान यांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विमा कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी विमा दावा मंजूर करून घेतल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.तक्रारीनुसार संबंधितांनी गट क्रमांक 200 व 201 साठी अनुक्रमे 17 हजार 734 रुपये व 9 हजार 981 रुपयांची विमा रक्कम घेतली. यासाठी दुसऱ्याच शेतातील पिकांचे फोटो वापरून खोटे पुरावे सादर करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.अर्जदाराने यापूर्वी सिंदखेड पोलीस स्टेशन व नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार दिली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली.

प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने तक्रार, प्रतिज्ञापत्र व सादर कागदपत्रांचा अभ्यास करून प्रथमदर्शनी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व कटकारस्थान यांसारखे गंभीर दखलपात्र गुन्हे दिसून येत असल्याचे नमूद केले. हा केवळ खासगी वाद नसून सरकारी योजनेतील निधीच्या गैरवापराशी संबंधित गंभीर प्रकार असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.यामुळे माहूर येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग बी. ए. अग्रवाल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 175(3) अंतर्गत सिंदखेड पोलिसांना संबंधितांविरुद्ध एफआयआर नोंदवून सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या