बाबासाहेब देशाचा प्रचंड गांभीर्याने विचार करायचे. लोकशाही चिरंतन रहावी यासाठी त्यांनी प्रचंड प्रगल्भ विचार लोकांत रुजवला. भारतीय संविधानाच्या निर्मितीसह लोकशाही समोरील आव्हाने, देशाला एकसंघ ठेवण्यासाठीचे प्रयत्न आदी पैलू त्यांची राष्ट्रनिष्ठा अधोरेखित करणारे आहे.
आज नामांतर लढ्याला यश आल्याचा सुवर्ण दिवस आहे. लोकशाहीचे पुरस्कर्ते बाबासाहेबांच नाव विद्यापीठाला देण्याचा मानस असलेल्या त्यांच्या अनुयायांचा हा लढा होता. त्यासाठी अनेकांना शहीदत्व पत्कारावे लागले. संपूर्ण एक पिढी उद्धस्त करावी लागली, तेव्हा साधारणतः दीड दशकांनंतर यश लाभलं!
बाबासाहेबांच एक भारतीय जनतेला खुले पत्र आहे. प्रबुद्ध भारतच्या १ ऑक्टोबर १९५७ च्या अंकात छापून आलेलं... यात बाबासाहेबांनी चळवळी, लोकशाही, जनतेची भूमिका आणि रिपब्लिकन पक्षाचे ध्येय आणि उद्दिष्टे असा उहापोह केलेला आहे. यात बाबासाहेबांनी लोकशाही चिरायू ठेवण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला होता; 'विचारी -विवेकी लोकमत' (Public Conscience)!
यात त्यांनी ज्यू लोकांची परिस्थितीचे वर्णन करून Public Conscience च महत्व पटवून दिलं होतं. त्यासह मि. स्कुट या गोऱ्या माणसाने उभ्या केलेल्या कृष्णवर्णीय -हिंदी लोकांसाठी घेतलेल्या stand चे देखील उदाहरणं दिले आहे.
अर्थात, ही भूमिका आंबेडकरी जनतेला विद्यापीठ नामांतर लढ्यावेळी काँग्रेस आणि तत्सम पक्षांकडून येणे अपेक्षित नव्हतं.परंतू विचारी लोकमत होण्याविरुद्ध ही सत्ताधाऱ्यांनी ध्रुवीकरण केलेले होते. जात अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन लोकांनी बघू नये यासाठी विशेष प्रयत्न केले होते. डाव्या, पुरोगामी आघाड्यांनी स्वतःच्या मर्यादेत हा लढा लढवला असला तरी या लढ्यात संपूर्ण ताकद ही आंबेडकरी समूहाने लावली, प्रसंगी प्राण दिले.
परंतू, वर्तमानात ही बाबासाहेबांनी व्यक्त केलेल्या चिंतेत सारखचं 'सामाजिक विवेकबुद्धी'चा अभाव कायम आहे. आजही या यशाचा आनंद आंबेडकरी जनतेच्या पलीकडे क्वचित दिसतो. त्यानंतर अन्याय -अत्याचारावेळी तर मूकसंमती असल्याचे जाणवते. ही निराशा आंबेडकरी जनतेच्या मनात कायम आहे!
स्वतःला संविधानवादी, प्रागतिक म्हणवून घेणाऱ्यांनी आंबेडकरी जनतेला केवळ स्वार्थासाठी लुटलं आहे. स्वतःच्या सत्तेसाठी चाकर बनवलं आहे. परंतू विवेकी लोकमत तयार करण्याची जबाबदारी कोणत्याही सवर्ण पुरोगामी वर्गाने, सत्ताधाऱ्यांनी पार पाडलेली नाही! किंबहुना, दोषारोपण केलेले दिसते!
आमची लढाई आमच्या अस्तित्वाची आहे, ती आम्हालाच लढावी लागेल ही भावना परभणी प्रकरणात ही नुकतीच दिसली आहे. बाळासाहेबांसह स्थानिक नेते -कार्यकर्ते मंडळी यांनीच याबाबत भूमिका घेतल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. या अश्या प्रसंगी इतर लोक (भारतीय) पुढे आले नाही तर ही परिस्थिती लोकशाहीला घातक असल्याचे बाबासाहेब म्हणतात, परंतू हे वास्तव नाकारता न येणार आहे!
आंबेडकरी जनतेच बाबासाहेबांवर आणि संविधानावर प्रचंड प्रेम आहे. अर्थात यास मी राष्ट्रीय नैतिकता आणि कृतज्ञता मानतो. परंतू या लढ्यानंतर अनेक दशके उलटून गेल्यावर पुन्हा समान परिस्थितीत नेमकं काय चिंतन असायला हवं यासाठी सर्वांनीचेच प्रयत्न असायला हवे !
- संविधान गांगुर्डे


0 टिप्पण्या