• कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक संपन्न
चित्रा न्युज ब्युरो
परभणी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांच्या प्रगतीकरीता शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.
मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची दखल घेऊन त्यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकरीता अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा आणि शेती विकासाचे कार्यक्रम राबविणे व त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणे अशा उपायायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्यावतीने कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुर्नरचना करण्यात आली आहे.
मिशनचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांच्यासह कृषी, रोहयो, कृषी विद्यापीठ, रेशीम, शिक्षण, आरोग्य, वन, कौशल्य विकास, सहकार, लिड बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन अनेक महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांकरीता राबवित आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने करावे. शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तालुकास्तरावर रोगनिदान शिबीरं आयोजित करावीत. सावकारी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. मुलांसाठी शिक्षणाची उत्तम सोय, स्पर्धा परिक्षा वाचनालय, शाळेत पटांगणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. कौशल्य विकास योजनांची प्रचार-प्रसिध्दी करावी. भरघोस उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन द्यावे. पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव व मोबाईल क्रमांक ग्रामपंचायत कार्यालयात दर्शनी भागात बोर्डावर ठळक नमूद करावा. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमालांचा किमान आधारभूत मूल्याचा फलक दर्शनी भागावर लावावा. जिल्यारात शेतकऱ्यांसाठीचा प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबवावा. वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईचे प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. गायरान जमिनीवर चारा लागवड करुन शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करुन द्यावा, या सूचना श्री. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच निरोगी जीवनासाठी सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी श्री. पाटील यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रशासन निश्चितपणे प्रयत्न करेल, असे सांगितले. श्रीमती ढालकरी यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.
0 टिप्पण्या