१ वर्षापासून खडीचे ढिगारे ; रस्ता होईना!
चित्रा न्युज ब्युरो
शहादा : १ वर्षापासून रस्त्यावर खडी टाकून ठेवलेला शहादा तालुक्यातील तवळाई ते आंबापूर व म्हसावद ते सुलवाडे रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व उप अभियंता पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील आंबापूर ते तवळाई व म्हसावद ते सुलवाडे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.या रस्त्याच्या बाजूला १ वर्षापासून खडीचे ढिगारे टाकून ठेवलेले आहेत. खडी रस्त्यावर इकडे तिकडे पसरलेली आहे.त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे.मटेरियल रस्त्यावर टाकून रस्त्याच्या कामाकडे ठेकेदार व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.
ठेकेदार व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली आहे.हा रस्ता दुरूस्ती करण्याचे काम कंत्राटदारास देण्यात आले आहे. परंतु ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूस खडी टाकून ठेवली आहे. वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.रस्त्यावर खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या