Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालय, खंडाळा येथे माता-पालक-शिक्षक संघाची सभा संपन्न



चित्रा न्युज प्रतिनिधी 
 साकोली:- तालुक्यातील टिळक विद्यालय, खंडाळा येथे दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या सभागृहात माता-पालक-शिक्षक संघाची एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी सभा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
        नियोजित पालक सभेचे अध्यक्ष व्यंकटजी उत्तमवार (शा. व्य. स. अध्यक्ष ) तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर, पी. एन. कापगते सर, डी.डी. तुमसरे सर, आर. जे. करंजेकर सर, इत्यादी उपस्तित होते. 
सभेला पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
      सभेचे प्रास्ताविकेतून डी.डी. तुमसरे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांबद्दल (उदा. एन.एम.एम.एस., स्कॉलरशिप, नवोदय) सविस्तर माहिती दिली. या परीक्षांची तयारी कशी करावी आणि त्यांचे फायदे कोणते आहेत, यावर मार्गदर्शन करण्यात आले. मागील तिमाहीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. गृहपाठ, प्रकल्प आणि नियमित अभ्यासाचे महत्त्व पालकांना. समजावून सांगण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी क्रीडा स्पर्धांची माहिती देण्यात आली. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळाचे असलेले महत्त्व स्पष्ट करण्यात आले.केवळ अभ्यासापुरते न थांबता, विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमांमध्ये पालकांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
     त्याचप्रमाणे  शाळेचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर यांनी आपल्या भाषणात, सांगितले, की विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळा आणि पालक यांच्यात उत्तम संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या अभ्यासासोबतच त्यांच्या सुप्त गुणांनाही प्रोत्साहन द्यावे."माता-पालकांनी यावेळी आपली मते मोकळेपणाने मांडली आणि शाळेच्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
        या सभेमुळे पालक आणि शिक्षकांमधील समन्वय अधिक दृढ झाला असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निश्चित झाली. सभा अत्यंत आनंददायी आणि फलदायी वातावरणात पार पडली.
       सभेचे संचालन ए. आर. कुंभरे सर यांनी तर आभार प्रदर्शन आर. जे. करंजेकर यांनी केले.
        सरते शेवटी सभेचे सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या