चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-महाविद्यालयीन जीवनात प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ, नवीन अनुभव घेण्याची तयारी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा देण्याची इच्छा या भावनां मधून मी NSS मध्ये प्रवेश केला. आज या दोन वर्षांचा प्रवास आठवताना मनात समाधान आणि अभिमान या दोन्ही भावना दाटून येतात.
या कालावधीत मला अनेक उपक्रमांमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध स्वच्छता उपक्रम, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, अनेक जनजागृती मोहीमा अशा अनेक उपक्रमांत मी सक्रीय सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून एड्स जनजागृती केली आणि समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली. प्रत्येक उपक्रमातून समाजाशी नातं घट्ट जोडत गेलो. NSS हा केवळ कामापुरता मर्यादित अनुभव नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक खरा प्रवास आहे.
या प्रवासात मला अनेक चांगले मित्र लाभले. NSS मुळे निर्माण झालेली मैत्री ही केवळ आनंदापुरती नसून समाजकार्यामध्ये साथ देणारी, योग्य मार्गदर्शन करणारी आणि प्रत्येक क्षणी प्रेरणा देणारी आहे. टीमवर्क, शिस्त आणि सेवाभाव ही मूल्यं मित्रांसह जगताना अधिक दृढ झाली.
या दोन वर्षांच्या कार्याची दखल घेत मला जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाल्याची आनंदवार्ता मिळाली. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर एक जबाबदारी आहे. माझ्या कार्याची मिळालेली ही अधिकृत मान्यता मला आगामी काळात आणखी प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा देते.
या पुरस्कारामागे माझ्या कुटुंबीयांचा विश्वास, माझ्या सहकाऱ्यांची साथ आणि विशेष म्हणजे आमच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. मोक्षदा नाईक मॅडम यांचे अखंड मार्गदर्शन व प्रोत्साहन आहे. तसेच, आमचे आदरणीय प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने मॅडम, प्रा. सुरेश राठोड सर, प्रा. मारोती मुंडे सर यांचे सततचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि शुभेच्छा लाभल्या. तसेच इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शनही लाभले.यासोबतच आनंदवन परिवाराचे पाठबळ आणि दिलेला अनुभव माझ्या सामाजिक जाणिवेला बळकटी देणारा ठरला. या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.
माझ्यासाठी हा पुरस्कार हा प्रवासाचा शेवट नसून एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळालेल्या शिकवणी, शिस्त व सेवाभाव यांचा आधार घेत मी आगामी काळातही समाजकार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार बाळगतो.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे केवळ स्वयंसेवा नव्हे, तर आयुष्याला योग्य दिशा देणारा अमूल्य अनुभव आहे, हेच या प्रवासाचे खरे सार आहे.
मयूर गंगाधर हनवते
आनंद निकेतन महाविद्यालय,
आनंदवन, वरोरा.
वर्ग -बी.कॉम.तृतीय वर्षे
मो. 9356962668


0 टिप्पण्या