Ticker

6/recent/ticker-posts

श्रेय वर्चस्वाच्या पाण्यात अडकली फुटलेली तलाव पाळीची नाव

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- राजकारणाच्या क्षेत्रात जाऊन राजकारण करण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण असे सूत्र ठरलेले असते. त्यानुसार प्रत्येक राजकारणी आपापल्या पद्धतीने आपापली राजकीय पोळी भाजून घेत असतात. परंतु सध्या साकोली तालुक्यातील राजकारणाचा आरसा बघता हे राजकारण आहे की गचकरण असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. वर्ष उलटूनही आणि पावसाळा तोंडावर आला असतांनाही तलावाची पाळ बांधून झाली नसल्याने साकोली-सेंदूरवाफा तालुक्यातील मासेमारी बांधव चांगलेच संतापलेले आहेत. राजकारण करा नाहीतर गचकरण करा आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. मागील वर्षी फुटलेल्या तलाव पाळीचे बांधकाम त्वरित सुरू करावे. अन्यथा आम्हा मासेमारी बांधवांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा दम आता मासेमारी बांधवांनी राजकारणी नेत्यांनाच दिलेला आहे. तलाव पाळ फुटल्यानंतर ज्या ज्या नेत्यांनी फोटोसेशन करून प्रसिद्धी माध्यमांसमोर आपले चेहरे दाखविले त्यांनी हिम्मत असेल तर आता तलाव पाळीवर पाय ठेवून दाखवावे अशा प्रकारच्या आक्रोश आता मासेमारी बांधवांच्या वदनातून निघत आहे. 
दरवर्षी तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय राहत असल्याने परिसरात कुपनलिका, विहीर, घरगुती बोअरवेला पाण्याची पातळी तग धरून राहत होती. गतवर्षी मात्र पाळ फुटली आणि तलावातील पाणी पूर्णपणे वाहून गेले. त्याबरोबरच लक्षवधी रुपयाचे मासोळीचे बीज वाहून गेले. तात्पुरते फुटलेल्या तलाव पाळीचे बांधकाम करून उन्हाळ्यात मजबूत पाळीचे बांधकाम करण्यात येईल असे आश्वासन सर्वच राजकीय नेत्यांनी दिलेले होते. तलाव पाळीचे मजबूत बांधकाम करण्यास अडचण जाऊ नये म्हणून तलावातील पाणीसुद्धा पूर्णपणे वाहू देण्यात आले. जेणेकरून बांधकामात अडचण जाऊ नये. त्याचा परिणाम असा झाला की तलावात पाणी नसल्याने तलाव परिसरातील बोरवेल, कुपनलिका, विहीर कोरड्या झाल्या. पाण्याची पातळी घसल्याने शेवटी या परिसरातील नागरिकांना रोज टँकरने पाणी पुरविरण्यात येत आहे. जून महिन्यापासून मृग नक्षत्राला प्रारंभ होतो म्हणजेच पावसाळा ऋतू प्रारंभ होतो. बांधकामासाठी केवळ एक महिना शिल्लक आहे. अद्यापही तलाव पाळीचे बांधकाम करण्याचा निधी उपलब्ध झालेला नाही. या मागणी करिता सर्वच राजकीय पक्षाकडून निवेदने देण्यात आली. परंतु अद्यापही फुटलेल्या तलाव पाळीचा प्रश्न मार्गी न लागल्याने मासेमारी बांधवांसमोर मासोळी उत्पादन करावे कसे करावे ? असा गहन प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. साकोली शहरातील मध्यभागात राष्ट्रीय महामार्गाला लागून जवळपास ८० ते ९० एकर क्षेत्राचा मालगुजारी तलाव आहे. या तलावात मासेमारी बांधव दरवर्षी पावसाळ्यात मासोळी बीज टाकून दिवाळीनंतर लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. मागील वर्षी ही पाळ अचानक फूटल्याने आणि मासेमारी बांधवांनी टाकलेल्या मासोळीचे बीज वाहून गेल्याने लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले होते. तलाव पाळ फुटल्याचे हे वृत्त सर्वदूर प्रसिद्धी माध्यमात येताच अनेक राजकीय प्रतिनिधींनी या स्थळाला भेट दिली. स्वतःचे फोटोसेशन करून प्रसिद्धी माध्यमाना पुरविले. ठळक मथळ्यात त्यांच्या बातम्या देखील उमटल्यात. नंतर मात्र सर्व गोष्टी वाऱ्यावर गेल्यात. जून नंतर पाऊस सुरू होईल. त्यामुळे मासेमारी बांधव संकटात सापडलेले आहेत. तलाव पाळ दुरुस्तीकरता सर्व स्तरावर निवेदन देण्यात आले. मात्र तलाव पाळीच्या बांधकामाचा निधी जर आलाच आणि काम सुरू झालेच तर याचे श्री कुणाला ? या श्रेय वर्चस्वाच्या लढाईत सध्या तरी हा प्रश्न प्रलंबित असल्याची गोपनीय माहिती उपलब्ध झालेली आहे.
______________________________________________

नेत्यांनी आपापल्या पक्षाचे राजकारण करावे त्याला आमचा विरोध नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आमची उपजीविका असलेल्या तलावाच्या बाबतीत राजकीय डाव खेळला जात असेल तर आम्ही मासेमारी बांधव खपवून घेणार नाही. केवळ एक महिना शिल्लक असतांना तलाव पाळीचे बांधकाम झाले नसल्याने आमचे मासेमारी बांधव संतापलेले आहेत. सर्व पक्षीय मिळून नेत्यांनी या तलाव पाळीचा प्रश्न जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मार्गी लावावा अन्यथा मासेमारी बांधवांचा उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. 

रामचंद्र वलथरे. मासेमारी बांधव
साकोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या