●खडीकरणाच्या प्रतीक्षेत ‘ग्राम समृद्धी’ योजनेचा बोजवारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी (श.प्र.) : तालुक्यातील निलागोंदी येथील शेतशिवारात जाणारे चारही पाणंद रस्ते गेल्या पंधरा वर्षांपासून खडीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल मजुरांमार्फत मातीचे काम तेव्हाच पूर्ण झाले, मात्र पुढील खडीकरण-मजबुतीकरण न झाल्याने पावसाळ्यात या रस्त्यांना चिखलाच्या साम्राज्याचे स्वरूप येते. परिणामी शेकडो शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
*चारही पाणंद रस्ते दुर्लक्षित*
मोरगाव पाटाची दान पासून मारबत टोलीपर्यंत,स्वप्नील हटवार यांच्या शेतापासून यशोराज हटवार यांच्या शेतापर्यंत,विनोद शामकुवर ते तुलाराम भुरे यांच्या शेताकडे जाणारा रस्ता, पाण्याची टाकी ते निलागोंदी पटाची दान पर्यंतचा रस्ता हे चारही पाणंद रस्ते निलागोंदी येथील शेतकऱ्यांसाठी मुख्य दळणवळणाचे साधन आहेत. या रस्त्यांच्या कडेला गावातील शेकडो एकर शेती असून खरीप व रब्बी हंगामात शेतीची मशागत, बियाणे, खते वाहतूक व काढलेला माल बाजारात नेण्यासाठी याच रस्त्यांचा वापर होतो.या रस्त्याला पावसाळ्यात कोंडी निर्माण होऊन पावसाळा सुरू होताच या कच्च्या पाणंद रस्त्यांवर गुडघाभर चिखल होतो. ट्रॅक्टर, बैलबंडी तर दूरच, पायी चालणेदेखील मुश्कील होते. बियाणे, रासायनिक खते डोक्यावर वाहून न्यावी लागतात. आजारी व्यक्तीला शेतातून बाहेर काढणेही जिकिरीचे होते. “पंधरा वर्षे झाली, फक्त माती टाकली. खडी, मुरूम टाकायला शासनाला वेळ नाही का?” असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
*‘ग्राम समृद्धी’ योजनेचा बोजवारा* :
शासनाने ‘ग्राम समृद्धी’ अंतर्गत मातोश्री पाणंद रस्ते तसेच बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत प्रत्येक पाणंद रस्त्याचे खडीकरण करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र निलागोंदीचे चारही रस्ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत. प्रस्ताव पाठवूनही निधी मंजूर होत नसल्याने काम रखडल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे.
*शेतकऱ्यांची मागणी* :
निलागोंदी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने नियोजनात नाव समाविष्ट केले असल्याने व्हीबी जी रामजी योजना अंतर्गत ग्रामीण पायाभुत सुविधा हा उद्देशपूर्ती साध्य करण्याच्या दृष्टीने चारही पाणंद रस्त्यांचे तातडीने खडीकरण व मजबुतीकरण काम मंजूर करण्याची मागणी केली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्याची“पेरणी पूर्ण झाली असून रोवणी तोंडावर आली असून रस्त्याअभावी शेती करणे कठीण झाले आहे. शासनाने ‘शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून विकास’ करण्याची घोषणा केली असली तरी निलागोंदीचा शेतकरी मात्र वीस वर्षांपासून चिखलात रुतल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खडीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.


0 टिप्पण्या