चित्रा न्युज प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून प्रस्तावित ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करावी, शिक्षक भरतीसाठीची TET परीक्षा रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, MPSC मार्फत वर्ग ३ व ४ च्या पदांच्या भरतीसाठीचा अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावा तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क आकारण्याऐवजी एकच शुल्क आकारण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या मांडल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की, या मागण्यांसाठी सरकारकडे अनेकदा निवेदने देण्यात आली, प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या तसेच विधानसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
आंदोलनकर्त्यांनी सरकारला १२ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम देत, तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. नितेश कराळे, अभिजित दिपके, रविकांत तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दीपक केदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार संजय काळे, माजी आमदार संजयभाऊ वाकचौरे, पंकजनाना बोराडे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे यांच्यासह विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्यभरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या