Ticker

6/recent/ticker-posts

एक दिलदार... लाजवाब... देखणा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा

एक दिलदार...  लाजवाब... देखणा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा
                  
                        
 प्रासंगिक:-रवि भोंगाणे

शासकीय नोकरी म्हटली की सेवानिवृत्ती आलीच. वयोमानापरत्वे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकालाच सेवानिवृत्तीला सामोरे जावे लागतेच. परंतु ही सेवानिवृत्ती शैक्षणिक आणि शाळा, महाविद्यालयातील असेल तर गुरुपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आदरांची भावना हृदयात सामावून घेते. कारण ज्या गुरुजींनी, ज्या सरांनी आपल्या आयुष्याची जडणघडण केली ते आई-वडिलांनंतर आपले दुसरे मायबाप असतात. विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात शेवटपर्यंत गुरुचे स्थान कायम असते. अशावेळी ज्या गुरूंनी आपल्या आयुष्यात सूर्याचे कवडसे निर्माण केले त्यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा कार्यक्रम बघून अंतर्मन दाटून येते. आपल्या गुरूंचा किंवा आपल्या सरांचा एक देखणा... लाजवाब... आणि दिलदार सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रम बघण्याचा त्यांच्याच विद्यार्थ्यांना यावा हा दिवस आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस असावा असं मला वाटतं. त्यांचा हा सेवावृत्ती सत्कार सोहळा एका कौटुंबिक परिवारात नुकताच शुभारंभ सभागृहात पार पडला. या देखण्य सोहळ्याचे असंख्य साक्षीदार यावेळी उपस्थित होते. हा हृदयस्पर्शी सत्कार सोहळा होता साकोली येथील मनोरभाई पटेल महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे पदवी व पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. खुणे यांचा. खरं तर सरांचे संपूर्ण नाव चिंतामण जनार्दन खुणे. परंतु ते सी.जी. खुणे सर याच नावाने आम्हा सर्वांना परिचित झाले. १२ जून १९६६ रोजीचा त्यांचा जन्म. मूळ गाव वडेगाव स्टेशन, तालुका अर्जुनी / मोरगाव, जिल्हा गोंदिया. सरांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश प्राइमरी स्कूल गरोबा मैदान नागपूर. माध्यमिक शिक्षण नेवजाबाई हितकारिणी हायस्कूल ब्रह्मपुरी. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जनता ज्युनिअर कॉलेज नागपूर. पदवी शिक्षण बीएससी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी. एम. एस. सी. पदवीधर प्राणीशास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, बी.एड. शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा. या शिवाय पी.एच.डी. ही पदवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथून २४ एप्रिल २००० रोजी संपादन केली. मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोली येथे २९ नोव्हेंबर १९९० ते ५ सप्टेंबर १९९१ पर्यंत प्रति माह ८०० रुपये मानधन तत्वावर सरांनी शैक्षणिक सेवेला सुरुवात केली. ६ सप्टेंबर १९९१ रोजी पूर्ण कालीन प्राध्यापक म्हणून ते रुजू झालेत. ऑक्टोबर १९९६ ते जून १९९७ पर्यंत डी. बी. सायन्स गोंदिया येथे सेवा देऊन पुन्हा आपल्या महाविद्यालयात जुलैला परतले. तेव्हापासून आजतागत जवळ जवळ ३६ वर्ष विद्यार्जनाचे प्रामाणिक कार्य करून महाविद्यालयात प्रदीर्घ सेवा त्यांनी दिली. या प्रदीर्घ सेवा काळात सरांनी ऑगस्ट २००९ पासून पदवी व पदव्युत्तर आणि प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून १७ वर्ष कार्य केले. जून २००७ ते २०२२ पर्यंत १५ वर्षे त्यांनी एन.सी.सी. विभागात कॅप्टन या पदावर कार्य केले. याच काळात एन.सी.सी. प्रशिक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याने सरांचा गौरव करण्यात आलेला होता. महाविद्यालयात पहिल्यांदा प्रोफेसर पदावर १३ ऑक्टोंबर २०२१ रोजी पदोन्नती झाली. फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२६ पर्यंत ३ वर्ष कार्यकारी प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले. सरांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. सर महाविद्यालयीन सेवाकाळात ३ वेळा नॅक कमिटीला सामोरे गेले. याशिवाय सरांनी विद्यापीठ कार्यात मोलाचे योगदान दिले. नागपूर विद्यापीठाच्या लेखी परीक्षेचे मुख्य परीक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. पेपर सेटिंग, पेपर मॉडरेशन, पेपर व्हॅल्युएशन तसेच एम. फी. एल. व पी.एच.डी. सुपरवायझर म्हणूनही त्यांनी कार्य केले. सरांच्या मार्गदर्शनात १५ विद्यार्थ्यांना एम.फील.ची पदवी तसेच ८ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त केली. या शिवाय सरांनी विविध विद्यापीठांच्या पीएचडी थेसीसचे परीक्षक म्हणूनही कार्य केलेले आहे. सरांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयांवर आधारित ३० च्यावर संशोधन लेख प्रकाशित झालेले आहेत. विविध चर्चा सत्रात सरांनी व्याख्याने दिलेली असून सरांच्या नावावर हिमालय पब्लिकेशनची " टेक्स्टबुक ऑफ एक्वाकल्चर " या नावाचे पुस्तक प्रकाशित आहे. सर्वात महत्त्वाचे आणि कौतुकाची बाब म्हणजेच सरांनी श्रीलंका, नेपाळ, थायलंड आणि दुबई या ४ देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पेपर प्रेझेंटेशन केलेली आहे. याशिवाय सरांचे सामाजिक कार्यात फार मोठे योगदान आहे. यापूर्वी सरांना शामरावबापू कापगते प्रतिष्ठान तर्फे आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते. सरांनी आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत केवळ विषय शिकविला नाही तर जगणं शिकवलं. वर्गात शिस्त, प्रयोगशाळांमध्ये जिज्ञासा आणि कार्यात आपुलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू राहिलेले आहेत. सरांच्या स्वभावाविषयी बोलायचे झाले तर सरांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ वृत्तीचा आणि वेळ प्रसंगी प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे. दुसऱ्यांना समजून घेणारे विद्यार्थी प्रिय आणि प्राध्यापक प्रिय असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय प्रा. डॉ. सी.जी. खुणे सर. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य खुशहालीमय आणि दीर्घा दीर्घायुषी जाओ या सदिच्छांसह प्रासंगिकाला तुर्त पूर्णविराम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या