Ticker

6/recent/ticker-posts

कब्रस्तान परिसरातील गरीब बेघरांना लवकर हक्काचे घर मिळावे; नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांच्याकडे सईद शेख यांचे निवेदन




चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : शहरातील लाला लजपतराय वॉर्डातील कब्रस्तान परिसरात गेल्या सहा-सात दशकांपासून वास्तव्यास असलेली अनेक गरीब कुटुंबे आजही मोडकळीस आलेल्या कच्च्या झोपड्यांमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. मुसळधार पावसात घरांमध्ये पाणी शिरणे, भिंती कोसळणे आणि जीवितास धोका निर्माण होणे, ही त्यांची नित्याची समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पात्र कुटुंबांना तातडीने घरकुलांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद सईद शेख यांनी भंडारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या परिसरातील काही कुटुंबप्रमुखांचे कोरोनाकाळात निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबांना संजय गांधी,निराधार योजना,बालसंगोपन योजना तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोहम्मद सईद शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, आजही ही कुटुंबे जीर्ण, कच्च्या घरांमध्ये जीव मुठीत धरून राहत असून त्यांना सुरक्षित निवाऱ्याची नितांत गरज आहे.
सततच्या पावसामुळे कब्रस्तान परिसरातील पाण्याचा वेगवान प्रवाह थेट घरांमधून जातो. परिणामी अनेक घरांमध्ये पाणी साचते, तर काही घरांच्या भिंती दोन-तीन वेळा कोसळल्या आहेत.  गत वर्षीही मुसळधार पावसामुळे एक-दोन घरे,भिंती पूर्णपणे पडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नुकसानीची दखल घेऊन तलाठीमार्फत पंचनामे करण्यात आले असून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदतीची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप संबंधित कुटुंबांना कोणताही लाभ मिळालेला नसल्याने त्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शेख यांनी दिली.

यापूर्वीही तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सात गरजू कुटुंबांना घरकुल मिळावे, यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्या पाठपुराव्याला यश मिळत संबंधित लाभार्थ्यांचे घरकुलासाठीचे पट्टे मंजूर झाले आहेत.

दरम्यान, मंजूर झालेल्या घरकुलांचे प्रत्यक्ष बांधकाम तातडीने सुरू करून पात्र लाभार्थ्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी ३ जुलै २०२६ रोजी मोहम्मद सईद शेख यांनी नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून8 प्रकरणाचा आढावा घेत, पात्र लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर घरकुलांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या