Ticker

6/recent/ticker-posts

भित्तिपत्र नव्हे ही तर freedom wall

भित्तिपत्र नव्हे ही तर freedom wall


मुलांसाठी स्वातंत्र्यभिंत. देशोदेशीचे ज्ञानेश्वर चालवतील ही भिंत.
शालेय वयात मुलांना लिहिते, वाचते करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. मुलांनी भरभरुन लिहावे असे मला नौकरीच्या सुरुवातीच्याच काळात वाटायचे. १९९७ ला मी साध्या काळ्या फळ्यावर लिहिता मंच सुरु केला. मी तेव्हा साकोली तालुक्यातील सानगडीच्या जि. प. हायस्कूलला होते. नवे गाव, नवाच चेहरा. माझ्यासाठी भंडारा जिल्हाच नवा. शालेय वयात कविता तयार करणे, त्या आईला वाचून दाखवणे. आईचा कौतुकाचा तो स्पर्श मला फार प्रेरणा द्यायचा. महाविद्यालयीन जीवनात गोदातीर समाचार, प्रजावाणी व अध्येमध्ये लोकमतलाही लिहायला सुरुवात केली होती. नौकरी लागल्यावर तर हक्काचे व्यासपीठ हाताशी आहे. माझ्या गुरुंनी मला लिहिते केले ते ऋण फेडायची वेळ आली होती. इकडून तिकडे उचलून नेता येईल असा काळा बोर्ड मिळाला. रोज एखादा करंट टॅापिक लिहायचा व मुलांनी दिवसभर त्यावर प्रतिक्रिया लिहायच्या. मुलांचे खरे स्वातंत्र्य. लिहू द्या विषयाला धरुन...मनातले, अंतरातले. चार खडू एक फळा एवढेच भांडवल. पण मुलं बिनधास्त लिहायला लागली. जे जे मनात ते ते फळ्यावर. पाच वर्षांनी बदली झाली. बदलीचे गाव शहरच. नावाजलेली वास्तू. इथे टेबलटेनिसच्या हिरव्या बोर्डवरच लिहायला सुरुवात केली. फळा. रंग कोणताही असो. हिंद देश के निवासी सभिजन एक है ! रंगरुप वेश भाषा चाहे अनेक है! अगदी तसेच होते फळ्यांच्या बाबतीतही. फळ्याचा रंग कोणताही असो त्यासाठी लिहिणे थांबवू नये.nलिहिण्यासाठीच्या जागा अशा निर्माण कराव्यात. नवं काही घडवणा-यांना दगड धोंड्यातून मार्ग काढावा लागतो. अडचणी येतात किरकोळ खर्च पण शाळा देत नाही. अडथळे इतके वाढतात की साहित्याची नासधूस होते. पण ध्यासमग्न शिक्षकाने थांबू नये अणि घेतला वसा टाकू नये. अविरतपणे चालत रहावे. नौकरीच्या माझ्या २८ वर्षात शाळेकडून किंवा मुलांकडून एक पैसाही न घेता मी हे मंच चालवत आले. काय कमी असतं शिक्षकांना. केवळ इच्छा शक्तीचा अभाव.मी का खर्च करायचा हा दरिद्री विचार. खरे तर मी व्यवहार शून्य आहे हे मी मान्य करते. मी शाळेतल्या उपक्रमांवर केलेल्या खर्चाचा हिशोब कोणासमोरच ठेवला नाही ना अपेक्षा केली. हे श्रीमंत मन फार जगावेगळा आनंद मिळवून देतं. किरकोळ खर्च तर शिक्षकांना करता येतात, तेवढे करायलाच हवेत. माझ्या इंग्रजकालीन शाळेत एका अडगळीच्या खोलीत मला एक मौल्यवान वस्तू दिसली. प्राचार्यांशी बोलून ती देखणी वस्तू मी माझ्या ताब्यात घेतली. गत २० वर्षांपासून मी त्या मंचाची मालकीन होते. तीन बाजूंनी उघडणारे ते लाकडी फिरते कपाट. मी प्रतिबिंब नावाने भित्तिपत्रक सुरु केले २००२ मध्ये. पारंपरिक, एैतिहासिक वस्तूंचे जतन करणं, त्या वस्तूंविषयीच्या संवेदना भावना अबाधित ठेवणे खरेच जिकरीचेच असते. त्या मंचाचे रितसर उद्घाटन केले. संपादक मंडळ स्थापन केले. संपादक, उपसंपादक, प्रुफ रिडर असली नावं माहित व्हावीत मुलांना पण, म्हणून मुद्दाम त्याच संबोधनांनी मी संवाद साधायची. ज्या ज्या गावी नौकरी केली तिथे तिथे मंचाची उभारणी आणि पुन्हा बदली. या भिंतीस freedom wall नाव दिले. संवेदना हे ही नाव होते. नाव कुठलेही असो गाव कुठलेही असो भाषा व्यवहाराला समजून घेणे मुलांना लिहिते वाचते करणे हाच उद्देश जपत काम करीत गेले.



काय संपादक महोदय,कुठवर आलेय छपाईचे काम. होत आला जी. सप्पाच झाला पण बांधावाचाच रायलाय. करतुनजी.
मुद्रणात दोष आढळलेयत का काही. नाई जी चांगला लिवाले शिकले जी. माझी प्रमाणभाषा व त्यांची झाडीबोली मज्जाच मज्जा. मुलांच्या अंतरंगात वाकून पाहण्याचा हा एकमेव मंत्र त्यांचीच भाषा बोलून बदलावे चित्र. खरे तर शिक्षकानेच भाषा व्यवहार जपायला हवा. बोली व प्रमाणभाषेचे सूत्र एकदा जुळले की मुलांना त्यांच्याच भाषेतून प्रगतकडे नेता येते. भित्तिपत्रासाठी तर खरे भांडवल भिंतच,फक्त भिंत. ही भिंत चालवली तर देशोदेशीचे ज्ञानेश्वर स्वत:च्या जीवनाची भावार्थदिपिका लिहायला लागतील. निर्जीव,निराकार,पांढरीशुभ्र भिंत दिसली की त्यावर रेघोट्या मारण्याची इच्छा बालकांना होते तोच त्यांचा पहिला भाषिक मंच. ओढू द्याव्यात रेघोट्या आकारु द्यावीत चित्र. चिमुकल्या हातांनी विश्व साकारते घडवावे भित्तिपत्र.
शाळेच्या भिंतींवर अजागळ व असभ्य भाषेत गुप्त पणे येऊन लिहिणा-यांनापण चांगले लिहिते करण्यासाठी हाच मंच उपयोगाचा. होय तुमचा मंच किलबिलायला लागला की विकृतांची टोळधाड तो मंच ते साहित्य उध्वस्त करण्यासाठी सरावलेले असतात. मुलं अजाणतेपणी असले कृत्य करतात शोध घ्यावा. महत्वाची कामं सोपवावीत याच मुलांकडे. उलट याच मुलांना प्रमुख करावे, लिहून घ्यावे, प्रवाहात आणावे. मूळात कोणतेच मूल वाईट नसते. सभोवतालचे वातावरण वाईट प्रवाहात आणत असते. तेच बदलायला हवे. भाषा शिक्षक भारत भाग्य विधाते असतात. चला घडवू या नवा भारत लिखाणाच्या माध्यमातून..
लिहित्या हातात कलम द्यावी... कलम करू नयेत हे हात... भाषा शिक्षकाने संयमाने, निष्ठेने भाषा संवर्धनाचे काम पुढे न्यावे.

                     माझा मराठाचि बोलु कौतुके

स्मिता वि.गालफाडे.
सेवानिवृत्त शिक्षिका, बालभारती सदस्य.
भंडारा. 
( शब्दांकन: रवि भोंगाने साकोली )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या