Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्सचा दणका! लंगडीभवानी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा ग्रामपंचायत सदस्यांनीच केला पर्दाफाश!


१ कोटी ३६ लाखांच्या निधीचा हिशेब तपासताना धक्कादायक दावे; ९ पैकी ४ कामे प्रत्यक्षात झालीच नसल्याचा सदस्यांचा आरोप!

कागदोपत्री विकास, प्रत्यक्षात कामे गायब? बाकडे, रस्ते, गटारी आणि पेव्हर ब्लॉकच्या कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह!

ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून दाखवली कामांची वस्तुस्थिती; सरपंच आणि ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी!


शहादा प्रतिनिधी : शहादा तालुक्यातील लंगडीभवानी ग्रामपंचायतीच्या कारभारात कथित आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप समोर आले असून, आता चक्क ग्रामपंचायत सदस्यांनीच चौकशीदरम्यान प्रत्यक्ष कामांची परिस्थिती व्हिडिओद्वारे समोर आणल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सन २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या तब्बल १ कोटी ३६ लाख ४० हजार १५५ रुपयांच्या निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.लंगडीभवानी येथील श्री. चेतन शांतिलाल पावरा यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमिततेबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश काढून गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा यांना १५ दिवसांच्या आत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निर्धारित मुदतीत चौकशी पूर्ण झाली नसल्याचा आरोप बिरसा फायटर्सने केला.त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी बिरसा फायटर्सच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट घेऊन स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी केली. या निवेदनानंतर ५ नोव्हेंबर रोजी चौकशी समिती लंगडीभवानी ग्रामपंचायतीत दाखल झाली.
              चौकशी सुरू असताना दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः व्हिडिओ तयार करून काही कामांची प्रत्यक्ष परिस्थिती दाखविल्याची माहिती समोर आली आहे.ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार, एकूण ९ कामांपैकी ४ कामे प्रत्यक्ष जागेवर झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही कामे कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्यांचा ठावठिकाणा दिसत नसल्याचे सदस्यांनी व्हिडिओद्वारे निदर्शनास आणून दिल्याचा दावा आहे.बाकडांसाठी ४ लाख ९७ हजार रुपये खर्च सन २०२४ मध्ये दाखवण्यात आला असून पुन्हा त्याच बाकडांसाठी सन २०२६ मध्ये तेवढीच रक्कम काढून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. रस्ता दुरुस्ती साठी ३ लाख ५० हजार रुपये खर्च दाखविण्यात आला असून रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. घोटाळीपाडा पेव्हर ब्लॉक साठी ४ लाख ९७ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला असून प्रत्यक्षात काम केले नाही. गटार बांधकामासाठी २ लाख ९९ हजार रुपये‌ खर्च दाखविण्यात आला असून प्रत्यक्षात काम झाले नाही.१ नळ जोडणीसाठी  २ लाख १३ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी महेश जाधव आणि सरपंच प्रीती निलेश सुळे यांच्या कार्यकाळातील संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्याची मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.चौकशी निष्पक्षपणे करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. चौकशी अहवालात फेरफार किंवा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास बिरसा फायटर्स संघटना तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.लंगडीभवानी ग्रामपंचायतीच्या या प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल काय निष्कर्ष काढतो, याकडे आता संपूर्ण शहादा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या