डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, आरोग्य कर्मचारी नाहीत; आदिवासी रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे? बिरसा फायटर्सचा संतप्त सवाल!
सरकारी पगार लाखोंचा, पण आरोग्य सेवा शून्य! १० नोव्हेंबरला बिरसा फायटर्सच्या अचानक पाहणीत धक्कादायक वास्तव उघड!
चित्रा न्युज प्रतिनिधी
अक्कलकुवा : एकीकडे सरकार आदिवासी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याच्या घोषणा करते, तर दुसरीकडे दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे चित्र समोर येत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले अंदाजे ३० कर्मचारी सलग १२ दिवस गैरहजर असल्याचे बिरसा फायटर्सच्या अचानक पाहणीत समोर आल्याचा दावा संघटनेने केला आहे. डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, आरोग्य कर्मचारी नाहीत; मग आदिवासी जनतेला आरोग्य सेवा देणार तरी कोण? असा संतप्त सवाल बिरसा फायटर्सने उपस्थित केला आहे.दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी बिरसा फायटर्सच्या पथकाने एका रुग्णाला सोबत घेऊन जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासण्याचा प्रयत्न केला असता ३० पैकी एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आल्याचे संघटनेने सांगितले. आरोग्य केंद्राचा दरवाजा उघडा ठेवण्यासाठी एक कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळले; मात्र डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, गर्भवती महिलेच्या प्रसूतीबाबत विचारणा केली असता संबंधित पुरुष कर्मचाऱ्याने आपणच प्रसूती करतो, असे सांगितल्याचे बिरसा फायटर्सच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशिक्षित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत गर्भवती महिलांच्या प्रसूतीची जबाबदारी नेमकी कोण पार पाडत आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारकडून आरोग्य केंद्राच्या इमारतीवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा लाखो रुपये खर्च होतात. मात्र प्रत्यक्ष गरजेच्या वेळी आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपलब्ध नसेल, तर या खर्चाचा उपयोग काय? सरकारी पगार घ्यायचा, सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा; पण जनतेला आरोग्य सेवा देण्याची वेळ आली की गायब व्हायचे, ही कोणती कार्यपद्धती आहे? असा सवाल बिरसा फायटर्सने उपस्थित केला आहे.अक्कलकुवा तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ आदिवासीबहुल भागातील नागरिकांना आजही मूलभूत आरोग्य सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था, रुग्णवाहिकांची अनुपलब्धता आणि वेळेवर उपचार न मिळण्याच्या समस्या कायम आहेत. काही ठिकाणी रुग्णांना बांबूच्या झोळीतून डोंगरदऱ्या पार करून रुग्णालयात न्यावे लागते.
तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमके करतात तरी काय? आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासण्याची जबाबदारी कोणाची? नियमित निरीक्षण केले जाते की केवळ कागदोपत्री अहवाल तयार केले जातात? ३० पैकी ३० कर्मचारी गैरहजर असल्याचा प्रकार घडत असेल, तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न बिरसा फायटर्सने उपस्थित केले आहेत.जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्सने केली आहे. "मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए?"हा केवळ चित्रपटातील संवाद नसून जांगठीच्या आरोग्य व्यवस्थेवर जनतेने विचारलेला संतप्त सवाल आहे.आदिवासी जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. आरोग्य केंद्रातील गैरहजेरी, आरोग्य सेवांचा अभाव आणि प्रशासकीय निष्काळजीपणा यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा बिरसा फायटर्सच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.


0 टिप्पण्या