Ticker

6/recent/ticker-posts

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यावलखेडच्या पवन तायडेचे घवघवीत यश; GREF परीक्षेत SC प्रवर्गातून देशात २४ वा क्रमांक!

 चित्रा न्यूज प्रतिनिधी 
अकोला : अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत यावलखेड (ता. अकोला) येथील पवन नारायणराव तायडे या तरुणाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GREF) परीक्षेत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून संपूर्ण देशात २४ वा क्रमांक मिळवत पवनने आपल्या गावासह अकोला जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.

पवनचे वडील अकोला शहरात बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करतात, तर आई शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही पवनने परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. स्वतः शहरातील ट्युशन क्लासमध्ये काम करून त्याने औद्योगिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि संघर्ष यांवर मात करत त्याने हे यश मिळविले.

पवनच्या या उल्लेखनीय यशाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि अकोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी यावलखेड येथील त्याच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पवन तायडे आणि त्याच्या आईचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या या यशाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना पवनने सांगितले की, घरामध्ये लहानपणापासूनच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिकवण ऐकायला मिळाली. या विचारांमुळे मनात जिद्द निर्माण झाली आणि प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करून यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बाबुळगाव सर्कलचे माजी अध्यक्ष प्रशांत शिरसाट, यावलखेडचे पोलीस पाटील हरिदास प्रधान, अक्षय खांडेकर, मिलिंद दामोधर, राहुल दामोधर, संजय कीर्तन, पंकज शिरसाट, बादल खांडेकर, प्रेम जामनिक, कार्तिक दामोधर, भावेश दामोधर, करण चक्रनारायण, विलास दामोधर, योगेश तायडे, मयूर दामोधर, गजानन सोळंके यांच्यासह गावातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या