कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
भडारा :-लाखनी तालुक्यात ११ जुलै पासून विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी संततधार तर काही गावात अतिवृष्टीमुळे ८२ घरांचे अंशतः नुकसान झाले असून नुकसानग्रस्त घरांचे तलाठ्यामार्फत पंचनामे करणे सुरू असल्यामुळे नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. वादळीवाऱ्यामुळे पालांदूर परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांची गैरसोय झाली.
पुष्य नक्षत्राची सुरुवात होताच संततधार पावसाचा अंदाज नागपूर वेध शाळेने वर्तविला होता. तो खरा ठरला असून ११ तारखेपासून संततधार पावसास सुरुवात झाली. ११,१२,१३ व १४ तारखेला अनुक्रमे १२.२०, ५३.४०, ५९.४०,१२.८० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. १३ जुलै सायंकाळी ५:०० वाजता दरम्यान पालांदूर परिसरास वादळाचा तडाखा बसला असून कच्च्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात वाकल ५९, मरेगाव १४, इसापूर २, खूनारी २, किटाडी १, रामपुरी १, पालांदूर २, मुरमाडी २ असे कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तहसीलदार महेश शितोळे यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी राकेश पंधरे यांच्या देखरेखीत तलाठ्यांकडून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करणे सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा निश्चित आकडा कळू शकला नाही. वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले व विजेचे खांब वाकल्याने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
*हनुमान मंदिरावर वीज कोसळली(चौकट)*
मरेगाव येथील जुन्या हनुमान मंदिरावर वीज कोसळल्याने रुखमा सुखदेव केवट(५५) आणि प्रज्वल मारुती चंदनबावणे(१८) रा. वाकल हे जखमी झाले असून मंदिराच्या गाभाऱ्याचे नुकसान झाले आहे. तलाठी सुनील कासराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तालुका व जिल्हा प्रशासनास या बाबद माहिती दिली आहे.


0 टिप्पण्या