• भंडारा-गोंदियात कमळ फुलणार की पंजा
• लोकसभा निवडणूक निकालाबाबद जनतेत औत्सुक्य
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पूर्ण झाले असून निकाल मंगळवार(ता.४जून) रोजी जाहीर होणार आहे. निकालाचे दुसऱ्या दिवशीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळेल काय ? या बाबद जनतेत औत्सुक्य असून मतदारांचा कल काँग्रेस च्या बाजूने तर सट्टा बाजार भाजपा निवडून येण्याचे संकेत देत असल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात कमळ फुलणार की पंजा याबाबद संभ्रम निर्माण होत आहे.
१७व्या लोकसभेची मुदत जून २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात संपत असल्याने मुदत संपण्यापूर्वी १८वी लोकसभा गठित होणे आवश्यक असल्यामुळे निवडणूक आयोगाने मार्च २०२४ मध्ये निवडणूक अधिसूचना जारी करून ७ टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार असल्याचे घोषित केल्याने आदर्श आचारसंहितेस सुरुवात झाली. पूर्व विदर्भातील ५ लोकसभा निर्वाचन क्षेत्राची प्रथम टप्प्यात १९ एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. त्यात भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा समावेश होता. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्याने राजकीय पक्षाचे समीकरण बिघडले. भाजपा, शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) सत्तेत सहभागी आहेत. तर काँग्रेस, शिवसेना(उध्दव ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विरोधी पक्षाची भूमिका पार पाडीत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती होती. सध्या ती परिस्थिती नसल्याने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र भाजपा व काँग्रेस च्या वाटेला गेले. त्यामुळे २० वर्षानंतर प्रथमतःच या लोकसभा निवडणुकीत पंजा हे चिन्ह दिसणार असल्याने काँग्रेस चा मतदार खुश होता.
भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात भाजपा चे विद्यमान खासदार सुनील बाबुराव मेंढे, काँग्रेस कडून डॉ. प्रशांत यादवराव पडोळे, वंचित बहुजन आघाडी कडून संजय गजानन केवट, बहुजन समाज पार्टी कडून संजय भैय्या कुंभलकर, अपक्ष सेवक वाघाये यांचेसह १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे म्हणून मतांचा जोगवा मागत होते. तर काँग्रेस ने संविधान संरक्षणाची भूमिका घेतली होती. खरी लढत भारतीय जनता पार्टी व काँग्रेसमध्येच होती. भाजपा चे खासदार सुनील मेंढे निवडून यावेत या करीत खासदार प्रफुल पटेल यांनी तर काँग्रेस चे डॉ. प्रशांत पडोळे निवडणूक यावे या करीत काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी अथक परिश्रम घेतले. निवडणूक कालावधीत व्हीव्हीआयपी आणि सेलिब्रिटींच्या मतदार संघात प्रचार सभाही झाल्या. भारतीय जनता पार्टी मागील १० वर्षापासून सत्तेत असून महागाई, बेरोजगारीने कळस गाठला असल्यामुळे जनता नाराज होती. त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीने संविधान बदलासाठी ४०० पार चा नारा दिल्याने जनक्षोभ उफाळून वर आला. तर काँग्रेस ने संविधानाच्या रक्षणासाठी मत मागितले असले तरी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात या दोन्ही पक्षाचा जनाधार असल्यामुळे निवडणूक अटीतटीची होईल. असे चित्र मतदार संघात दिसत होते.
आता सातही टप्प्यातील निवडणूक पार पडली असून मंगळवार ४ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचेकडून मत मोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. योगायोगाने मत मोजणी नंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक ५ जून २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा वाढदिवस असून भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्र ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. तसेच २० वर्षानंतर या क्षेत्रातून काँग्रेस निवडणूक लढत असल्याने पंजा निवडणूक चिन्ह काँग्रेस समर्थकांना दिसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साह संचारला होता. निवडणुकीत त्यांनी तशी मेहनतही घेतली. त्यामुळे आमदार नाना पटोले यांना वाढदिवसाची गिफ्ट मिळेल काय ? की कमळ फुलणार ? या बाबद सभ्रम निर्माण झाला आहे.
0 टिप्पण्या