Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी


रक्कम थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार सिडींग आवश्यक

राकेश आसोले चित्रा न्युज
पालघर :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्हयातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची आधार सिडींग करुन ई - केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

जिल्हयात 31 जुलैपर्यंतचे 2 लाख 96 हजार 229 अर्ज प्राप्त झाले असून, 2 लाख 83 हजार 221 अर्ज मंजूर करुन लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या पैकी  आधार सिडींग नसलेल्या 61 हजार 224 लाभार्थ्यांना व्यक्तीशा बँकेत / पोस्टात जाऊन आधार सिडींग करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अंतिम मंजुरीने शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील 2 लाख 21 हजार महिलांना प्रत्येकी 3 हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. आधार सिडींग करुन ई - केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी आधार सिडींग करुन ई - केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

आधार सिडींग करुन ई केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबाइल संदेश पाठविण्यात आला आहे, त्यांनी तातडीने आपले खाते आधार सिडींग करुन ई - केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या