चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-बार्शी शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असून, नुकत्याच झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोटरसायकली चोरीला गेल्याच्या तक्रारी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या चोरीच्या घटना १९ व २० ऑक्टोबर रोजी घडल्या.
पहिल्या घटनेत, शिवाजी आखाडा परिसरातील रहिवासी शिवाजी तानाजी पोकळे (वय ३२) यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१३-सीझेड-२०६८) मोटरसायकल घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. १९ ऑक्टोबरच्या रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते २० ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही मोटरसायकल चोरीला गेली.
दुसऱ्या घटनेत, महादेव मंदिराजवळील चोरमुले प्लॉट परिसरातील रहिवासी सूरज धनाप्पा कोटकर (वय ३०) यांनी भाजी मंडईच्या उत्तर बाजूस उभी केलेली त्यांची काळ्या रंगाची होंडा शाईन (एमएच-१३-डीव्ही-१११४) मोटरसायकल अवघ्या १५ मिनिटांत चोरीला गेल्याची तक्रार दिली. २० ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वानऊ वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान भाजी घेऊन परत येईपर्यंत मोटरसायकल गायब झाली होती.
या घटनांमुळे बार्शी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष तपास पथके तयार केली आहेत. या घटनांच्या अनुषंगाने पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
0 टिप्पण्या