म्हसावद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सहआरोपी करा व निलंबित करा- बिरसा फायटर्सची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : जुगनी तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीला जुगनी येथील राहत्या घरातून ओढून ताणून जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसवून पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे अनोळखी व्यक्तीला ५ लाख ६५ हजार रूपयांनी विक्री करणा-या मुलीचा मामा धाकल्या जाहग-या तडवी,सोन्या पु-न्या वळवी( आजोबा),माणिकराव सोन्या वळवी चूलत भाऊ ),दारासिंग सोन्या वळवी चुलत भाऊ,अनिल राहला वळवी चुलत भाऊ,ईस्माईल राहला वळवी चुलत भाऊ,गणेश इंद्या वळवी सख्या भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व कायदेशीर कडक कारवाई करा व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास ,कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करणा-या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे म्हसावद यांना सह आरोपी करून कायदेशीर कारवाई करा व सेवेतून तात्काळ निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पोहल्या पाडवी यांनी दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी व गुलाबसिंग पाडवी व गणपत वळवी यांनी दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रार पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे म्हसावद व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांना जुगनी येथील अल्पवयीन मुलीस त्यांच्या नातेवाईकांनी पंढरपूर येथील अनोळखी व्यक्तीस ५ लाख ६५ रूपयाला विकल्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करा,असा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते यांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची वाचा फोडून तिला न्याय मिळावा,या हेतूने तक्रार अर्ज दाखल करीत आहेत. परंतू म्हसावद पोलीस ठाण्यातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तक्रारदार यांना तुमच्यावरच गुन्हा दाखल करतो,वगैरे सांगून मदत करणा-यांनाच आरोपी करण्याचा प्रयत्न करीत आहेत व धमकी देत आहेत. आरोपीविरुद्ध अद्यापही गुन्हा नोंद न करीत आरोपींना पाठिशी घालण्याचे काम करत आहेत.बिरसा फायटर्स ने तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित दलालांनी पंढरपूर येथे जाऊन विकलेल्या व्यक्तीला पैसे परत करून अल्पवयीन मुलीला म्हसावद पोलिस ठाण्यात आणले व जुगनी येथील मुलीच्या आईच्या ताब्यात दिले.बिरसा फायटर्सच्या दणक्याने एका आदिवासी मुलीची हैवानापासून सुटका झाली आहे.परंतू आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यामुळे या गंभीर प्रकरणात आरोपींना वाचवत प्रकरण दाबण्याचे काम म्हसावद पोलिसांनी केले आहे,असा आरोप बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.
0 टिप्पण्या