उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवेदन
चित्रा न्युज ब्युरो
शहादा : आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांचे फोटों बॅनरवर लावून नंदूरबार जिल्ह्य़ात हिंदू धर्माचा प्रचार करणा-या विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांतची सामाजिक समरसता यात्रा तात्काळ थांबविण्यात यावी,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्रभूदत्तनगर शाखेचे अरूण पावरा,शहादा शहरचे योगेश मोगरे,दिपक मोगरे,नवनाथ अहिरे,नितेश निंगोडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत तर्फे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे,क्रांतिकारक खाज्या नाईक,जननायक तंट्या मामा भील,हुतात्मा नाग्या कातकरी,क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, राणा पुंजा भील ,वीरांगना झलकारीबाई, राणी दुर्गावती,जयपाल सिंह मुंडा,वीर एकलव्य व आदिवासी कुलदेवता याहा मोगी माता इत्यादी आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांचे फोटो बॅनरवर लावून नंदूरबार जिल्ह्य़ात हिंदू धर्माचा प्रचार केला जात आहे.सदर बॅनर वर समरस हिंदू,समर्थ हिंदू,जात पात की करो बिदाई हम सब हिंदू भाई भाई असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला आहे.आदिवासी क्रांतीकारक व देवी देवतांच्या फोटोंचा गैरवापर करून विश्व हिंदू परिषद नंदूरबार जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत हिंदू धर्माचा प्रचार करीत आहे.कोणीही धर्माचा प्रचार करायला आमच्या आदिवासी क्रांतिकारक व देवी देवतांच्या फोटोंचा आधार घेऊ नये,यास आमचा विरोध आहे.आदिवासी क्रांतीकारक हे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले ,आपल्या प्राणांची आहुती दिली.ते हिंदू धर्मासाठी लढले नाहीत. तरी या यात्रेद्वारे आदिवासी क्रांतीकारक हे हिंदू होते,असा चुकीचा प्रचार विश्व हिंदू परिषद तर्फे सुरू आहे.हा अपप्रचार त्वरित थांबवावा.
आदिवासी हे हिंदू नाहीत, असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा २००१ चा निर्णय आहे.आदिवासी हा हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य कोणत्याही धर्माचा नाही.आदिवासींचे अस्तित्व स्वतंत्र आहे. आदिवासी हा प्रकृती पूजक आहे. आदिवासींची संस्कृती ही कोणत्याही धर्माशी मिळतीजुळती नाही.तसेच आदिवासींचे रितीरिवाज, रूढी परंपरा व आदिवासींचे देवी, देवता हे सुद्धा वेगळे आहेत.तरी विश्व हिंदू परिषद या धार्मिक संघटनांतर्फे आदिवासी देवता व आदिवासी क्रांतिकारकांच्या फोटोंचा बॅनरवर आधार घेऊन आदिवासी क्रांतिकारक,आदिवासी देवी देवता व संपूर्ण आदिवासी समाज हे हिंदू होते,असा चुकीचा प्रचार करून समाजात भ्रम पसरवत आहेत.अशा अपप्रचारामुळे आदिवासी समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण होत आहे.या यात्रेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.तसेच ही यात्रा धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारी आहे.म्हणून विश्व हिंदू परिषद तर्फे नंदूरबार जिल्ह्य़ात सुरू असलेली यात्रा तात्काळ थांबविण्यात यावी.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून ही यात्रा रोखून याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.


0 टिप्पण्या