Ticker

6/recent/ticker-posts

श्रीविठ्ठल मंदिर संवर्धन काम निकृष्ट दर्जाचे – महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचा आरोप


चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-महाराष्ट्राचा अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी केलेली प्रत्यक्ष पाहणी आणि उपस्थित केलेले मुद्दे खळबळजनक आहेत.

गणेश अंकुशराव यांनी नुकतेच मंदिरात भेट दिली आणि सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना बाजीराव पडसाळीतील महादेव (महालक्ष्मी) मंदिराच्या छताला गळती असल्याचे आढळले. त्यांनी असेही निदर्शनास आणले की, मंदिराच्या बांधकामात जुने दगड पुन्हा पॉलिश करून वापरले जात आहेत.

नवीन बांधकामात आधुनिक मशिनरीचा वापर केला जात असून, यामुळे जुन्या मंदिराच्या मजबुत ढाच्याला हादरे बसत असल्याचे अंकुशराव यांनी निदर्शनास आणले. याशिवाय, नवीन बांधकाम केलेल्या दगडांमध्ये मोठमोठ्या फटी पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्थितीमुळे मंदिराचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा धोक्यात आल्याचे ते म्हणाले.

अंकुशराव यांनी प्रशासन आणि मंदिर समितीवर गंभीर आरोप करताना म्हटले की, अनेक मंत्री आणि अधिकारी दर्शनासाठी मंदिरात येतात, मात्र संवर्धन कामाची पाहणी करत नाहीत. त्यांनी असेही म्हटले की, यांच्याकडून केवळ देवाचे दर्शन घेतानाचे फोटो पाहायला मिळतात; मात्र मंदिराच्या कामाबाबत कोणीही गांभीर्याने पाहणी करत नाही.

श्रीविठ्ठल मंदिराच्या संवर्धन कामात होणाऱ्या हलगर्जीपणावर अंकुशराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिक भाविकांनीही या कामाबाबत नाराजी व्यक्त केली असून, मंदिराच्या संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्रातील भाविकांसाठी हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून ऐतिहासिक वारसा आहे, यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या