Ticker

6/recent/ticker-posts

वाघाच्या हल्ल्यात बांबू कामगाराचा मृत्यू, मृतदेहाजवळ पाच तास वाघाचा ठिय्या

चित्रा न्युज ब्युरो
चंद्रपूर:- जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. १४ जानेवारी २०२५ रोजी वाघाच्या हल्ल्यात बांबू कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे वाघाने मृतदेहाजवळ पाच ते सहा तास ठिय्या मांडून वन कर्मचाऱ्यांनाही थांबवले.

१४ जानेवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजता बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये ही घटना घडली. बांबू कंत्राटदार नगीन पुगलिया यांच्या युनिट क्रमांक ५ मध्ये ५७ वर्षीय कामगार लालसिंग बरेलाल मडावी (राहणार मंडला, मध्यप्रदेश) बांबू कापणीचे काम करत होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करत त्यांना ठार मारले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, वाघ मृतदेहाजवळ बसून कर्मचाऱ्यांना थांबवत होता. वाघाने उलट धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने अतिशीघ्र दलाला पाचारण करण्यात आले.

अतिशीघ्र दलाचे शूटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध केले. पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघाची तपासणी करून त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. अंदाजे चार वर्षांच्या या नर वाघाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आले.

कामगार लालसिंग बरेलाल मडावी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेने वन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

२०२५ या वर्षातील ही मानव-वन्यजीव संघर्षाची दुसरी घटना असून २०२४ मध्ये अशा हल्ल्यांमध्ये २९ नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी २७ जण वाघाच्या हल्ल्यात बळी पडले.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. स्थानिक रहिवासी आणि कामगारांनी वन विभागाला या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

वन्यजीव संरक्षण आणि मानवांच्या सुरक्षेमधील संतुलन राखण्यासाठी शासन व स्थानिक प्रशासनाने अधिक कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या