Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनी शाळेत झेंडावंदन न करणा-या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करा- बिरसा फायटर्सची मागणी


गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

शहादा :२६  जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ मंदाणे  तालुका शहादा या शाळेत झेंडावंदन न करणा-या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,कैलास पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                             २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन  व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे आपले राष्ट्रीय सण असून देशभरात शासकीय व निमशासकीय, खाजगी शैक्षणिक संस्थेत, शाळा ,महाविद्यालयात झेंडावंदन करून सण उत्साहात साजरा केले जातात. परंतू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  क्रमांक ३ मंदाणे  तालुका शहादा येथील शाळेत २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले गेले नाही,असे बातम्याद्वारे समजले आहे.या शाळेत गेल्या १०-१५ वर्षांपासून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले जात नसल्याचे विद्यार्थी पालकांचे व  ग्रामस्थांचे म्हणणे आहे.ही एक गंभीर बाब आहे.प्रजासत्ताक दिनी शाळेच्या गेटला सकाळपासून कूलूप लावलेले होते व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक विद्यार्थांना घेऊन अन्य शाळेत झेंडावंदन करायला गेले,असेही सांगण्यात येत आहे.
                       मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांचे सर्व शाळेत २६ जानेवारी २०२५ रोजी  झेंडावंदन करण्यात यावे,असे स्पष्ट आदेश असतांना शहादा तालुक्यातील मंदाणे क्रमांक ३ येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या १० ते १५ वर्षापासून राष्ट्रीय सणाच्या दिवशी झेंडावंदन केले जात नाही,असे पालक सांगत आहेत.ही एक लाजीरवाणी बाब आहे.शाळेत झेंडावंदन का केले जात नाही? झेंडावंदन न करण्याबाबत तसे वरिष्ठांचे आदेश आहेत का?शाळेत झेंडावंदन न करण्यामागे कोणाचा तरी दबाव आहे का?किंवा झेंडावंदन न करण्यामागे अन्य कारण आहे,याची सखोल चौकशी करून झेंडावंदन न करणा-या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली म्हणून जबाबदार धरून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व  १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय सणाच्या दिवशी शाळेत झेंडावंदन करण्याबाबतच्या लेखी सख्त सूचना देण्यात याव्यात. अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या