चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर-: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केले असून आज तिसरा दिवस पूर्ण झाला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. या परिस्थितीमुळे बार्शी येथे आनंद काशीद यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सरकारचे प्रतीकात्मक ‘तिसरे वैकुंठ स्नान’ घडवून सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
आनंद काशीद यांनी सरकारला आठवण करून दिले की, 26 जानेवारी 2024 रोजी नवी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळचे सरकार पुन्हा सत्तेत आले असताना मराठा समाजाला फसवणे योग्य नाही. त्यांनी सरकारला चेतावणी दिली की, मराठा समाजाला वेळोवेळी फसविण्याचे प्रकार थांबवावेत, अन्यथा समाजाचे आंदोलन अधिक उग्र होईल.
मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य उपोषणामुळे खालावत आहे. त्यामुळे त्यांना उपोषण सोडण्याची आवश्यकता आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन तातडीने ठोस पावले उचलून मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधवांनी सरकारला इशारा दिला की, मराठा समाजाला योग्य न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. आंदोलनादरम्यान विक्रम बापू घाईतेडक, पांडुरंग घोलप, बालाजी डोईफोडे, अविनाश लोंढे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
आंदोलकांनी सरकारला आवाहन केले की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी घेत त्यांच्या उपोषणाचा शेवट करावा. अन्यथा येणाऱ्या काळात हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पसरून अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला.


0 टिप्पण्या