पालकांनी बालकांना वेळ द्या व शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या – किशोरीमार्फत संदेश
लातूर :-उदगीर तालुक्यातील मोरतळवाडी या ठिकाणी कलापंढरी संस्थेच्या पुढाकारातून बालकांचे शिक्षण आणि संरक्षण या विषयावर कार्य सुरु असून, बालकामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजातील विविध सामाजिक प्रश्नावर लोक जागृती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच प्रभाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिराजी मोरतळे, गोविंद चामे, चंद्रकांत मोरतळे, तंटामुक्ती अध्यक्ष मारोती सावकार, बिरादार गुरुजी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सौदागर सर, हलबुरगे मॅडम, वाघमारे मॅडम तसेच कलापंढरी संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक शिवदर्शन सदाकाळे इत्यादी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील मुलींनी कलापथकाच्या माध्यमातून मोबाईलच्या दुनियेत पालकांचे आपल्या पाल्याकाडील होत असलेले दुर्लक्ष, मुलींचे शिक्षणाचे महत्व, बालविवाह व बालमजुरी प्रतिबंधाचा संदेश, पालकांनी आपल्या मुलीचा बालविवाह न करता तिच्या पायावर उभे राहण्यासाठी पदवीपर्यंत शिक्षणाच्या प्रवाहात ठेवावे, तिच्या आवडीच्या क्षेत्रात तिला करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, बालमजुरीला न पाठवता शिक्षणाच्या प्रवाहात ठेवल्यास नक्कीच मुलगी तिच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करून ती तिच्या पायावर उभी राहते, फक्त तिला पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, या विविध नाटिकेतून पालकांना संदेश देण्यात आला.
तसेच यादरम्यान देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी व स्फुर्तीगीते इ. च्या माध्यमातून बालकांच्या कलाकौशल्यास प्रेरणा देण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलापंढरी संस्थेची कार्यकर्ते संगीता पाटील, वैशाली सोनकांबळे, संदीप सोमवंशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौदागर सर यांनी केले.
0 टिप्पण्या