Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे कत्तलीसाठी गायींची वाहतूक वैराग पोलिसांची कारवाई, ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर: धाराशिव येथे कत्तलीच्या उद्देशाने मोठ्या जर्सी गाईंची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैराग पोलिसांनी तातडीने कारवाई करत १४ गाईंची सुटका केली. तसेच या प्रकरणी एका टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास रातंजन (ता. बार्शी) येथील बसस्थानकाजवळ करण्यात आली.

वैराग पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एमएच-४३-यू-२७४७ क्रमांकाचा एक टेम्पो धाराशिव येथे कत्तलीसाठी गायी घेऊन जात आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रातंजन बसस्थानकाजवळ नाकाबंदी करून संशयित टेम्पो अडवला. तपासणी केली असता, या वाहनात १४ मोठ्या जर्सी गाई अत्यंत निर्दयीपणे, जागेअभावी कोंबून ठेवलेल्या असल्याचे आढळले.

या वाहनात गायी गुंतागुंत होईल अशा स्थितीत भरलेल्या होत्या. त्यांना चारापाणी किंवा औषधोपचाराची कोणतीही सुविधा नव्हती. तसेच वाहनातील जागा अतिशय अरुंद असल्याने गायींना हालचालही करता येत नव्हती.

पोलिसांनी तातडीने सर्व गाईंची सुटका करून टेम्पो चालक नाजेर फराद गवंडी (वय ३७, रा. खाजा नगर, धाराशिव) याला ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी २.८० लाख रुपये किमतीच्या १४ जर्सी गाई तसेच ४ लाख रुपये किमतीचा सहा चाकी टेम्पो असा एकूण ६.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सागर उमाटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पोचालक नाजेर फराद गवंडी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ मधील कलम ५(अ), ५(बी), ९(ब), ११ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११ (१), ११ (१)(ए), ११ (१)(एफ), ११ (१)(एच), ११ (१)(आय) तसेच प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ अंतर्गत कलम ४७, ५४, ५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गायींच्या कत्तलीसाठी वाहतूक करणे हा गुन्हा असून, दोषींवर कडक कारवाईची तरतूद आहे. यापूर्वीही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली आहे. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावी, जेणेकरून निर्दोष प्राण्यांची सुटका होईल आणि अवैध कृत्य रोखले जाईल.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या