चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-कंदलगाव शिवारातील शेतजमिनीच्या वादातून एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबास शेजारी राहत असलेल्या तीन जणांनी मिळून मारहाण करत गंभीर जखमी केल्याची तक्रार मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गौराप्पा शिवण्णा व्हनमाने (वय ५५ वर्षे, व्यवसाय - शेती, रा. कंदलगाव, ता. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबासोबत शेतामध्ये शेतीकाम करत असताना २९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता शेजारी असणारे शिवराय व्हनमाने, म्हाळप्पा व्हनमाने आणि कविता व्हनमाने (सर्व रा. कंदलगाव, ता. सोलापूर) यांनी त्यांच्या शेतातील गवत आणि झाडे जाळण्यास सुरुवात केली.
फिर्यादी गौराप्पा यांनी विरोध करताच म्हाळप्पा व्हनमाने याने रागाच्या भरात “हे शेत आमचे आहे, तुला काय करायचं?” असे म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण गौराप्पा यांचा मुलगा महेश करत होता. ते पाहून शिवराय व्हनमाने याने लोखंडी रॉडने महेशच्या खांद्यावर वार करून जखमी केले, तर म्हाळप्पा व्हनमाने याने महेशचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर गौरा यांचे पत्नी सुरेखा आणि गौराप्पा हे दोघे सोडवायला गेल्यानंतर म्हाळप्पा व्हनमाने याने गौराप्पा यांच्या डोक्यात, पाठीत व पायावर रॉडने मारहाण केली. शिवराय व म्हाळप्पा या दोघांनी मिळून सुरेखा यांनाही हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर तिघेही जखमी अवस्थेत मंद्रुप पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे पाठवले, त्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात शिवराय म्हाळप्पा व्हनमाने, म्हाळप्पा अमोगसिद्ध व्हनमाने व कविता म्हाळप्पा व्हनमाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 टिप्पण्या