चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:- बार्शी तालुक्यातील दडशिंगे शिवारात शेत पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी अशोक भागवत भोसले (रा. दडशिंगे, ता. बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल शिवाजी जगताप (वय 46 वर्षे, व्यवसाय शेती, रा. घर क्रमांक 105, माळे गल्ली, कसबा पेठ, बार्शी) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत व शेती करून उपजीविका चालवतात. मिलिंद गणपत काशीद यांची मौजे दडशिंगे (ता. बार्शी) येथील शेती अमोल जगताप यांनी बटईने घेतली असून ते नियमितपणे तेथे कामासाठी जात असतात.
दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अमोल जगताप बार्शीतून निघाले व 11 वाजता दडशिंगे येथील शेतावर पोहोचले. तेथे शेतमालक मिलिंद काशीद व चालक विक्रम शेवाळे काम करत असताना, शेजारी असलेले अशोक भागवत भोसले आपल्या शेतात खोऱ्याने काही काम करत होते.
दरम्यान, अमोल जगताप यांनी बटईने घेतलेल्या शेतात चालू असलेल्या झाडांची तोड व कंपाउंडच्या कामाची पाहणी करण्यासाठी जाताच, अशोक भोसले यांनी त्यांना अकारण शिवीगाळ सुरू केली. त्यावर अमोल जगताप यांनी "कोणाला शिव्या देत आहात?" असे विचारताच, अशोक भोसले याने "तुलाच शिव्या देतो आहे" असे म्हणत खोऱ्याने त्यांच्या डाव्या पायावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे अमोल जगताप यांना गंभीर दुखापत झाली.
यावरही थांबता अशोक भोसले याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर शेतमालक मिलिंद काशीद व चालक विक्रम शेवाळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यानंतर अमोल जगताप यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने पोलीसांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे पाठवले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी तब्येत सुधारल्यावर आज (दि. 26 एप्रिल 2025) अधिकृत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक भागवत भोसले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 952, 951(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


0 टिप्पण्या