बिल्डरांवर गुन्हे दाखल, पण IAS अधिकारी अजूनही मोकाट कसे? - विनोद खोब्रागडे यांचा सवाल
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील दे.गो. तुकूम रय्यतवारी येथील तब्बल 497 एकर सरकारी जमीन बेकायदेशीरपणे अकृषिक करून बिल्डरांच्या घशात घातल्याचा व त्यातून 25,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप तत्कालीन तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केला आहे.
विनोद खोब्रागडे, तत्कालीन तलाठी/पटवारी, वरोरा यांच्या आरोपानुसार, 2007 पासून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत बाबुराव पवार, सध्याचे IAS अधिकारी, यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 106 वापरून ही सरकारी जमीन अकृषिक केली.
खोब्रागडे यांचा दावा आहे की, "या कलमानुसार महाराष्ट्रात कुठेही शेतजमीनसुद्धा अकृषिक केली जात नाही. इथे तर थेट सरकारी जमीनच अकृषिक करून तिची विल्हेवाट लावण्यात आली. यामुळे महाराष्ट्र शासनाचे 25,000 कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे."
*गुन्हा दाखल पण कारवाई नाही?*
या प्रकरणी विनोद खोब्रागडे यांनी 2020 मध्ये अनेक बिल्डरांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, "या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत बाबुराव पवार आजही मोकाट आहेत," असा आरोप खोब्रागडे यांनी केला.
"2007 पासून आतापर्यंत अनेक जिल्हाधिकारी चंद्रपुरात येऊन गेले, तरीही या अधिकाऱ्याविरुद्ध एकही जिल्हाधिकारी कारवाई का करत नाही?" असा रोखठोक सवाल विनोद खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे.
*दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्याचा उल्लेख*
खोब्रागडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा उल्लेख करत, "त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा महाघोटाळा उघडकीस आणून त्यांना जेलमध्ये पाठवले," असा दावा केला आहे व चंद्रपुरातही तशीच कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


0 टिप्पण्या