चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे:- जुनवणे, ता. जि. धुळे येथील 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा 25 मे, 2025 रोजी चिंचगव्हाण, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे बालविवाह होणार आहे. बालिका व तीचे कुटुंब 24 मे, 2025 रोजी हळदीच्या कार्यक्रमासाठी दुपारी 4.00 वाजता चिंचगव्हाण येथे निघणार आहेत. अशी माहिती 24 मे, 2025 रोजी दुपारी 3.52 वाजता चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर धुळे येथे मिळाली. बालविवाहाचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन, धुळे टीमचे (समुपदेशक) वर्षा पाटिल, मुकेश महिरे (सुपरवायझर), संदिप पवार (केसवर्कर) यांच्या मदतीने जुनवणे गावाचे बालविवाह प्रतिबंध अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांना या प्रकरणाविषयी माहिती देण्यात आली.
त्याअनुषंगाने ग्रामसेवक यांनी बालिकेच्या घरी गृहभेट घेतली असता. सदरचे कुटुंब हळदीसाठी निघाले असल्याचे समजले. त्यानंतर ग्रामसेवक यांनी कुटुंबाशी संपर्क करुन त्यांना अर्ध्या रस्त्यातून (बोरकुंड) येथे परत बोलावले. कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार माहिती देऊन समज देण्यात आली. संबधित बालिकेच्या पालकांना नोटीस देऊन 26 मे, 2025 रोजी बालकल्याण समिती समोर उपस्थित करण्यात आले. बालकल्याण समितीने बालिकेच्या पालकांकडून बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच नाशिक चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला या केसबाबत माहिती देऊन बालिकेसोबत विवाह करीत असलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनाही समज देण्याबाबत सांगण्यात आले.
हा बालविवाह थांबविण्याची कार्यवाही करतांना ग्रामसेवक राजेंद्र शिंदे. पोलिस पाटील जितेश वाघ, सरपंच योगेश पाटिल तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे सुपरवायझर मुकेश महिरे, केसवर्कर संदिप पवार यांनी कामकाज पाहिले. यासाठी त्यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण व चाईल्ड हेल्पलाईनच्या प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर यांचे मार्गदर्शन लाभले.
अल्पवयीन मुलीशी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. असा गुन्हा घडत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्र.१०९८ वर संपर्क करा. या नंबरवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येते. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0 टिप्पण्या