Ticker

6/recent/ticker-posts

ही घटना केवळ दुःखद नाही, तर राजकीय अपयशाची लाजीरवाणी पातळी - ॲड. प्रकाश आंबेडकर यांची संतप्त प्रतिक्रिया !


चित्रा न्युज प्रतिनिधी 
जळगाव :  जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात २४ वर्षीय संताबाई बारेला या आदिवासी महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. २६ मे रोजी प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी अनेकवेळा संपर्क साधला, मात्र कोणतीही मदत मिळाली नाही. शेवटी, तिला दुचाकीवरून जवळच्या वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना, रस्त्यातच तिची प्रसूती झाली. यावेळी उपस्थित महिलांनी लुगड्याचा आडोसा करून प्रसूती केली आणि आवश्यक साधने नसल्यामुळे दगडाच्या सहाय्याने बाळाची नाळ कापली. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ट्विट करत ते म्हणाले की, ही घटना केवळ दुःखद नाही, तर ही अनेक दशकांच्या राजकीय अपयशाची लाजीरवाणी खालची पातळी आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारने विकासाचे कितीही गाजर दाखवले, तरी आदिवासी आणि वंचितांसाठी मूलभूत आरोग्य सेवा पुरवण्यात ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कोणतेही सरकार असो, वंचितांसाठी आरोग्य व्यवस्था सुधारण्याऐवजी त्यांनी पिढ्यानपिढ्या फक्त वोट "बँक" बनवली आहे. दवाखाने बनवले नाहीत, फक्त वोट बँक उभी केली! आज आरोग्य हक्क नसून फक्त घोषणांचं साधन राहिलं आहे. आणि त्याची किंमत कोण चुकवतं? तर वंचित समूह!

ज्यांच्या हाती वैद्यकीय साधने असायला हवीत, त्यांच्या हाती आजही दगड आहेत. हा अपमान फक्त त्या महिलांचा नाही, तर मानवतेचा आहे! लाज वाटावी अशी बाब आहे ही, अशी टीका त्यांनी सरकारच्या अपयशी आरोग्य यंत्रणेवर केली आहे. 

या हृदयद्रावक घटनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
--------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या