Ticker

6/recent/ticker-posts

पानगाव रस्त्यावर भीषण अपघात : सुलक्षणा घायतिडक यांचा मृत्यू, अज्ञात बुलेटस्वाराविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापुर– बार्शी तालुक्यातील काळेगाव येथील रहिवासी सुलक्षणा शरद घायतिडक (वय ३८) यांचा २४ मे २०२५ रोजी पानगाव रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, याप्रकरणी बुलेट मोटारसायकल चालकाविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सचिन अशोक घायतिडक (वय ३५, रा. काळेगाव, ता. बार्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भावजय सुलक्षणा शरद घायतिडक, त्यांच्या मुलीसह आणि सोबत गणेश महादेव घायतिडक यांच्यासह एका लग्न समारंभासाठी काळेगाव येथून पानगावकडे निघाले होते. सुलक्षणा घायतिडक व त्यांची मुलगी स्वतःच्या इलेक्ट्रिक स्कुटरवर, तर फिर्यादी स्वतःच्या मोटारसायकलवर होते.

शरयू अॅक्वा जवळील पानगाव रोडवर समोरून भरधाव वेगाने व राँग साईडने येणाऱ्या बुलेट क्रमांक MH 44 J 0786 ने त्यांच्या स्कुटरला जोराची धडक दिली. या अपघातात सुलक्षणा यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांना नाक, कानातून रक्तस्राव झाला आणि त्या जागीच बेशुद्ध पडल्या. त्यांच्या मुलीस देखील किरकोळ दुखापत झाली. बुलेटस्वार कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला.

जखमी सुलक्षणा यांना तत्काळ जवळच्या कारमधून बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यानंतर वैद्यकीय तपासणी आणि सर्व धार्मिक विधी पूर्ण करून, अपघाताचा कायदेशीर पाठपुरावा करण्यासाठी फिर्यादीने ३० मे रोजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

या घटनेत बुलेट चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवत रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून अपघात घडवून आणल्याचे स्पष्ट होते. त्याच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेला प्राण गमवावा लागला असून, स्कुटरचे सुमारे १५,००० रुपये नुकसानही झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून न थांबता निघून गेल्यामुळे संबंधित चालकाविरुद्ध मोटर वाहन अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघातात वापरलेली बुलेट MH 44 J 0786 च्या मालकाचा शोध लावण्यात येत असून लवकरच दोषी चालकास अटक होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या