चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे – जुन्या कॉलेजच्या प्रेमात अडकलेल्या सैन्यातील कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा थंडपणे खून केल्याची थरकाप उडवणारी घटना धुळ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात तसेच राज्यभरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव शारदा उर्फ पूजा बागुल असून तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनी मिळून हा घातपात केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल बाळू बागुल (मुख्य आरोपी) हा सैन्यात क्लर्क म्हणून कार्यरत आहे. त्याने पत्नी पूजाचा विषप्रयोग करून खून केला. इतकेच नव्हे तर तिच्या डोक्यात वस्तू मारल्याचेही शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कपिलसह त्याची सासू विजया बागुल, नणंद रंजना, तसेच त्याची प्रेयसी प्रज्ञा कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे.
कपिल बागुल याचे शिक्षण धुळ्यातील जयहिंद कॉलेजमध्ये झाले असून कॉलेजमध्ये शिकत असताना त्याचे प्रज्ञा कर्डिले हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, 2007 साली प्रज्ञाचे लग्न झाले. तिला 17 आणि 13 वर्षांच्या दोन मुली आहेत. सध्या प्रज्ञाचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी कपिल आणि प्रज्ञा पुन्हा संपर्कात आले आणि त्यांचे संबंध अधिक गहिरे झाले.
प्रज्ञासोबत पुन्हा संबंध जुळल्यानंतर कपिलने आपल्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने पूजाला विष दिले. विषप्रयोगानंतर पूजाच्या तोंडातून फेस येऊ लागला. तब्बल दीड तास ती तडफडत होती, मात्र कपिल तिला मदत न करता तटस्थपणे तिच्याकडे पाहत बसला होता. शेवटी पूजाचा मृत्यू झाला.
पूजाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र स्थिती गंभीर पाहता तिला शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. याच दरम्यान, कपिलने इतरांच्या मदतीने पूजाच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी वेळेवर हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला.
मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यामध्ये विषप्रयोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कपिलसह त्याच्या आई, बहिण आणि प्रेयसीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पूजा हिचा सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ होत होता. याबाबत पूजाने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, योग्यवेळी महिला आयोगाने हस्तक्षेप केला असता तर पूजाचा जीव वाचला असता, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणाचा तपास पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. खुनाचा उद्देश, हत्येपूर्वीचे सर्व घडामोडी, इतर सहभागींची भूमिका यांचा बारकाईने तपास करण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासात अजून काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या