चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि पालि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी पालि भाषा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे सर्व सत्र डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे सकाळी १० वाजता सुरू होणार असून, देशातील ख्यातनाम भिक्खू व तज्ज्ञ व्यक्तीमत्वांची उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात पूज्य भदंत डॉ. यश काश्यपायन महाथेरो (जयसिंगपूर, सांगली) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी मा. प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असतील. उद्घाटक म्हणून आयु. मा. चंद्रकांत सांगलीकर, संस्थापक अध्यक्ष, अथर्व चॅरीटेबल ट्रस्ट, गुगवाड, हे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रथम सत्रात पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर (चंद्रपूर) यांची धम्मदेसना होणार असून, द्वितीय सत्रात डॉ. विजय मोहिते (सिद्धार्थ कॉलेज, मुंबई) हे पालि भाषेच्या सामाजिक व बौद्धिक संदर्भावर आधारित व्याख्यान देतील. या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र-कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ राहणार आहेत.
समारोप सत्रात देखील भदंत डॉ. यश काश्यपायन महाथेरो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. परिसंवादाचे संयोजन प्रा. डॉ. गौतम कांबळे (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन), डॉ. अतुल लकडे (प्र. कुलसचिव), डॉ. उत्तम कांबळे आणि आयु. विजकुमार झुंबरे (सहाय्यक प्राध्यापक) यांनी केले असून, मा. राजाभाऊ सरवदे (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या परिसंवादातून पालि भाषा, बौद्ध संस्कृती आणि धम्मविचार यांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून विवेचन होणार असून, संशोधक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या