Ticker

6/recent/ticker-posts

शिवीगाळ, धारदार शस्त्राने वार, गंभीर जखमी – बार्शीत चार संशयितांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी शहरातील संतोषी माता चौक व 14 नंबर शाळेजवळ 28 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता घडलेल्या एका हिंसक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. अक्षय दयानंद शिंदे (वय 28, रा. केसकर हॉस्पिटलसमोर, जयशंकर मिल जवळ, बार्शी) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अक्षय शिंदे हे पुणे येथून बार्शी येथे घरकुल योजनेसंदर्भात आवश्यक कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्यांचे चुलतभाऊ ओम शिंदे यांच्या मोटारसायकलवरून 14 नंबर शाळेकडे जात असताना, त्यांच्या पाठिमागून दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार इसमांनी त्यांना अडवले. यामध्ये राहुल भाऊ शेंडगे, तुषार अवघडे, मंथन शेळके आणि एक अनोळखी युवक यांचा समावेश आहे.

प्राथमिक तक्रारीनुसार, राहुल शेंडगे याने फिर्यादीस अर्वाच्य शिवीगाळ करत कमरेतून कोयता काढून त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. तसेच इतर तिघांनी त्याच्या डोक्यात दगड मारून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले. फिर्यादीने जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दादा मुद्दे यांच्या हॉटेलमध्ये पळ काढला, मात्र संशयितांनी त्याठिकाणी जाऊन त्याला हल्ला करून गंभीर दुखापत केली.

हल्ल्यानंतर संशयितांनी “तू परत आमच्यासमोर आलास तर तुला ठार करू” अशी धमकी दिली. शिवाय, फिर्यादीच्या खिशातील 4000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले व त्याचा मोबाईल फोन चुलतभावाकडे सुपुर्त केला.

जखमी अवस्थेत अक्षय शिंदे यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धाराशिव सिव्हील हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले. रक्तस्त्राव थांबत नसल्यामुळे त्यांना खासगी सुविधा हॉस्पिटल, बार्शी येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 नुसार कलम 115(2), 118(2), 119(1), 3(5), 333, 351(2), 351(3), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी  कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या