चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : - नगर परिषदेच्या स्थापनेला सलग २९ वर्ष होऊनही स्वच्छ आणि सुंदर नगर परिषद क्षेत्रातील या प्रभागातील समस्या जणू काही पाचवीलाच पुजल्या आहेत दिवसोंदिवस समस्या गंभीर व जीवघेण्या होत आहे. प्रभागाचा फेरफटका मारल्यास अनेक मूलभूत व आवश्यक सुविधाचा अभाव सर्वत्र जाणवतो. अनेक नगरसेवक आणि चक्क दोन नगराध्यक्ष या प्रभागातून झालेत मात्र या प्रभागात कायम स्वरुपी रस्ते, नाली बांधकाम, वीज पुरवठा, स्वच्छ पाणी पुरवठा, चौकाचे सौंदर्यीकरण, मोकळ्या जागेत बगीचा, आदी विकासात्मक कामे करण्यात नापास झालेत.
अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉईंट, स्वराज नगर येथील मुख्य मार्ग, तिकडे गणेश मंदिर परिसर, साक्षात मृत्यूला पाचारण करणारा मार्ग ठरला आहे.. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कित्येक जीवघेणे अपघात होत आहे.. नागरिक ओरडतात मात्र त्यांचा टाहो बधीर प्रशासन ऐकत नाही. या प्रभागातील स्मशानभूमीची अवस्था पाहिल्यास मृत्यूनंतर अंतिम संस्कारा वेळी खुद्द मृत्यू पावलेल्या देहाची व नातलगांची होरपळ पाहून यमाला सुद्धा शरम येईल..
विविध समस्यांबाबत नगर परिषदेला साकडे घालूनही उपाययोजना करण्यात येत नाही परिणामतः पाऊल वाकडे करून स्थानिक प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा येथील युवक वर्ग व नागरिक व्यक्त करीत असल्याचे दिसत आहे. दुर्दैवाने एखादी गंभीर घटना वा जीवितहानी झाल्यास सदर नगर परिषद भद्रावती व त्यांची यंत्रणा यास पूर्णतः जबाबदार असेल असा संताप प्रभागातील महिला व्यक्त करतात. त्यामुळे पाहणी करून सबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी या वॉर्डातील ज्योतीताई आस्कर, अरुणा जोगी, सुभाष निंबाळकर, रितेश बूच्चे राजू खुटेमाटे , मनीष बूच्चे, अमर सावनकर आदींनी केली आहे.
0 टिप्पण्या