नवरात्री हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र व उत्साही सण आहे. या नऊ दिवसात देवीची आराधना करून स्त्रिशक्तीला वंदन केले जाते. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या त्रिदेवतांच्या उपासने द्वारे भक्त मनोबल, आरोग्य, समृद्धी व ज्ञान प्राप्त करण्याचा संकल्प करतात.
आजच्या आधुनिक युगात स्त्रिया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. नवरात्री म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर स्वतःमधील शक्ती, आत्मविश्वास व आत्मभान जागृत करण्याचा काळ आहे. त्यानिमित्ताने महिलांसाठी प्रेरणादायी संदेश देत आहे.
१) *स्वतःची शक्ती ओळखा* -
प्रत्येक स्त्री मध्ये दुर्गा, लक्ष्मी व सरस्वतीचे गुण आहेत. संघर्ष करण्याची दुर्गाशक्ती, घर - कारभार व अर्थव्यवस्थेचे नियोजन करण्याची लक्ष्मीशक्ती आणि ज्ञान पारख वाढविण्याची सरस्वती शक्ती अंगी बाळगावी.
२) *आरोग्याला प्राधान्य द्या* -
उत्सव काळात उपवास, जागरण, प्रवास यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे योग्य आहार, पुरेशी झोप व शारीरिक हालचाल यांचे भान ठेवणे आवश्यक आहे.
३) *सामाजिक जबाबदारी* -
देवीची आराधना करताना स्त्रीशक्तीचा सन्मान समाजात रुजवणे महत्वाचे आहे. मुलींना शिक्षण, सुरक्षा, स्वावलंबन यांचा अधिकार देणे ही खरी देविपूजा ठरते.
४) *स्वावलंबनाचा संकल्प* -
आर्थिक, सामाजिक व वैयक्तिक पातळीवर स्वावलंबी होणे हाच आत्मविश्वासाचा पाया आहे. कौशल्य विकास, लघुउद्योग, स्वयंपूर्णतः या गोष्टींवर भर द्या.
५) *समत्व व सहकार्य*. -
स्त्रीने घरातील जबाबदाऱ्याबरोबरच स्वतःच्या आवडीनिवडी, करिअर व प्रगती साठीही वेळ द्यावा. नवरात्रीच्या निमित्ताने कुटुंबात समजूतदारपणा व सहकार्याची भावना वाढवा.
६) *आध्यात्मिक उन्नती* -
नवरात्री हा आत्मचिंतनाचा काळ आहे. ध्यान, वाचन, सत्संग यांचा अवलंब करून मानसिक शांती मिळवा.
महिलांनो, नवरात्री आपल्याला शिकविते की स्त्री ही केवळ कुटुंबाची नाही तर समाजाची आधारस्तंभ आहे. तिच्या सामर्थ्याचा योग्य उपयोग झाला तर समाज, राष्ट्र व संस्कृतीचे रक्षण होते. प्रत्येक महिलेने स्वतःतील देवीशक्ती ओळखून नवरात्रीच्या माध्यमातून नवी उमेद, नवा संकल्प व नवा आत्मविश्वास जागृत करावा...
! धन्यवाद !
---------------------------------------
शब्दांकन
वनिता गजानन घुमे
चंद्रपुर जिल्हा समन्वयक, राज्य महिला आयोग मुंबई.
_________________________


0 टिप्पण्या