चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : ग्रामविकास, स्थानिक प्रश्न आणि सामाजिक समन्वयावर सखोल चर्चा; नव्या समितीच्या निवडीचे गावकऱ्यांकडून स्वागत
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे दिनांक १९ डिसेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत लोकशाही प्रक्रियेचा सशक्त प्रत्यय आला. ग्रामसभेच्या प्रारंभी गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विशेष समस्या, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसह विविध विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर आणि चिकित्सक चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी आपापली मते निर्भीडपणे मांडत प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या ठोस उपाययोजनांची मागणी केली. विकास हा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसला पाहिजे, अशी ठाम भूमिका अनेकांनी मांडली.
या चर्चेनंतर ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. गावातील सर्व घटकांचा व्यापक पाठिंबा लाभल्याने भीमरावजी पाला यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड केवळ औपचारिक नसून, गावातील सामाजिक सलोखा, न्याय्य निर्णयप्रक्रिया आणि वादविवादांचे शांततामय निराकरण यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. तंटामुक्ती समिती ही गावातील लहान-मोठ्या वादांचे कायदेशीर चौकटीत, समन्वयाने निरसन करणारी महत्त्वाची यंत्रणा असल्याने अध्यक्षपदाची जबाबदारी अधिक संवेदनशील ठरते.
या समितीत विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले आहे. सरपंच अनिल आलाम, उपसरपंच सौ. प्रीती पवार, वकील प्रतिनिधी विशाल उपरे, डॉक्टर प्रतिनिधी प्रियंका पिंपळकर, अल्पसंख्याक प्रतिनिधी जगतसिंग वधावन व अजित सिंग तांक, अनुसूचित जाती प्रतिनिधी श्री. भास्कर सिडlम पत्रकार प्रतिनिधी प्रवीण चिडे, व्यापारी प्रतिनिधी राम अवतार सोनी युवा प्रतिनिधी नयन ऊराडे, तसेच प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून सुधाकर मोरे, अजय भाऊ रेड्डी, सत्यपाल ताकसांडे, मोतीराम दोबलवार यांचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी म्हणून अरुण झाडे, तर प्रशासकीय पातळीवर बीट हवालदार विजयकुमार मुंडे आणि नियंत्रण तलाठी शिल्पा बल्लेवार यांची उपस्थितीही ग्रामसभेला लाभली.
नव्या तंटामुक्ती समितीच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले. गावातील वादविवादांना न्याय्य, पारदर्शक आणि शांततामय मार्गाने सोडवण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, ही समिती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक दुवा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. लोकशाही, सामाजिक समन्वय आणि विकास यांचा संगम साधणारी ही ग्रामसभा विरूर स्टेशनसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.


0 टिप्पण्या