चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :लाखणी तालुक्यातील पालांदूर परिसरात अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत सुमारे 6 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पालांदूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(ई) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय साकोली येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई लोकेश पांडुरंग कोटवार यांनी पालांदूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत धनपाल हरिदास तरोणे (वय 34, व्यवसाय ट्रॅक्टर चालक, रा. मेरागाव/जुना या.लाखणी जि. भंडारा) याच्यावर अवैध रेती वाहतूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. 17 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9.46 वाजताच्या सुमारास साकोली उपविभागातील पालांदूर परिसरात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू होती. यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे मौजा पालांदूर शिवारात एका ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर अडवून चालकाची चौकशी केली.
पोलिसांनी चालकास रेती वाहतुकीसंदर्भातील परवान्याची मागणी केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंचांसमक्ष पंचनामा करून ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच-36 एएल-5248, ट्रॉली तसेच अंदाजे एक ब्रास रेतीचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरची किंमत अंदाजे 5 लाख रुपये, ट्रॉलीची किंमत 1 लाख 50 हजार रुपये तर रेतीची किंमत अंदाजे 6 हजार रुपये इतकी आहे. एकूण 6 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस कर्मचारीनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या