सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्ता अरुंद; दुचाकीस्वार, पादचाऱ्यांच्या जीवाला धोका
चित्रा न्युज प्रतिनिधी
वरोरा / शेगाव (बु) :शेगाव ते वरोरा या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढली असून आता ती थेट रस्त्यावर आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
मेसा गावापर्यंतच्या या मार्गावर बाभळीच्या झाडांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. कडेला असलेल्या झाडांची छाटणी न झाल्याने काटेरी झुडपे रस्त्याच्या मध्योमध झुकली आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि विशेषतः पादचाऱ्यांना काट्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना ही काटेरी झाडे अंगाला लागत असल्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर ही झुडपे अधिक धोकादायक ठरत असून रस्त्याचा अंदाज येत नाही. वळण घेताना किंवा बाजूने वाहन जात असताना गंभीर अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्ता नवा झाला असला तरी काठची झाडे छाटली जात नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे. वरोरा उपविभागीय बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्यावर आलेली ही काटेरी झाडे तोडावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
पावसाळ्यापूर्वी किंवा कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी ही झाडे हटवून रस्ता मोकळा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील त्रस्त नागरिकांनी दिला आहे. "मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का?" असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
---
----------------------------------
शेगाव-वरोरा मार्ग मृत्यूचा सापळा! रस्त्यावर आलेल्या काटेरी बाभळीमुळे अपघातांचा धोका. PWD च्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त. पावसाळ्यापूर्वी झाडे हटवा, नाहीतर आंदोलनाचा इशारा. प्रशासन लक्ष देणार का?


0 टिप्पण्या