Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा वनविभागाची यशस्वी कारवाई : बिबट आणि दोन पिल्लांचा सुरक्षित बचाव

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:- भंडारा वनविभागातील अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या केसलवाडा (मौजा खापरी) परिसरात आज पहाटे बिबट (मादी) व तिची दोन पिल्ले आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मानव-वन्यप्राणी संघर्ष टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, गावालगत असलेल्या शमशानभूमीच्या बंद नाल्यात सकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास बिबट मादी व तिची दोन पिल्ले (एक नर व एक मादी) असल्याचे वनकर्मचाऱ्यांना कळले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. योगेश आर. शर्मा यांनी तात्काळ पथकाला घटनास्थळी पाठवले. तसेच स्थानिक नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांत खापरी परिसरात पशुहानीच्या घटना घडत असल्याने आणि बिबटाने मानवी वस्तीमध्ये प्रवेश केल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन बिबटाला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पिंजरा लावून बिबट व तिच्या पिल्लांना सुरक्षितरीत्या पकडले.
यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिसलवार यांनी बिबट व तिच्या पिल्लांची तपासणी केली. तपासणीत तिघेही पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी बिबट व तिच्या पिल्लांना सुरक्षित जंगल परिसरात मुक्त करण्यात आले.
या बचाव मोहिमेत उपवनसंरक्षक श्री. योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री. सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. योगेश शर्मा, जीवशास्त्रज्ञ श्री. शुभम मोदनकर, वनपाल श्री. आर. आर. दुनेदार, क्षेत्र सहाय्यक श्री. दीपक रंगारी, वनरक्षक श्री. निलेश श्रीरामे, श्री. संदीप भुसारी, कु. आर. व्ही. घोनमोडे तसेच अड्याळ वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचारी आणि RRT टीमच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वनविभागाच्या या तातडीच्या आणि समन्वयित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या