Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वसतिगृह शुल्क माफ करा; बंद वसतिगृहे सुरू करा

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्र. कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांना निवेदन


 चित्रा न्यूज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन वसतिगृह शुल्क माफ करावे,आकारण्यात आलेले वसतिगृह शुल्क परत करावे तसेच बंद असलेली सर्व वसतिगृहे तातडीने सुरू करावीत, अशा विविध मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांना देण्यात आले यावेळी मराठवाड्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव आणि उपजीविकेसाठी कुटुंबांचे होणारे स्थलांतर याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीवर होणार
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणी, निवासाची समस्या आणि शैक्षणिक खर्चाचा वाढता भार यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती, मानसिक तणाव तसेच शैक्षणिक आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक व आर्थिक संतुलन राखण्यासाठी विद्यापीठाने विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही जागेअभावी खासगी खोल्या व पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, डबल पीजी दुबार पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, हिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वसतिगृह खाली करण्याची सक्ती करू नये, बंद वसतिगृहे सुरू करून त्यांची क्षमता वाढवावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. तसेच आर्थिक अडचणी आणि निवासाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी विशेष विद्यार्थी निवास सुरक्षा व शैक्षणिक गळती प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.

दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला बसू नये, ही विद्यापीठ प्रशासनाचीही सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी सचिन निकम, बाळू गायकवाड, कुणाल भालेराव, अतुल चव्हाण, प्रा.प्रबोधन बनसोडे, हनुमंत भाले आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या